पूरस्थिती आणि मदतकार्य
जिल्हाधिकारी आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरस्थितीबाबत माहिती दिली. शासनाने पूरग्रस्तांसाठी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू देण्याचे आदेश दिले असून, या धान्याचे वाटप सुरू आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना रोख मदतही दिली जाणार आहे.
सहा तालुक्यांतील ८८ गावे बाधित
पुरामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ८८ गावे बाधित झाली आहेत. यात माढा २२, करमाळा ११, मोहोळ २१, अक्कलकोट १०, उत्तर सोलापूर ९ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १५ गावे आहेत. आतापर्यंत ४ हजार ५२१ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
advertisement
चाऱ्याची टंचाई आणि उपाययोजना
पूरामुळे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर तोडगा म्हणून शेजारच्या जिल्ह्यांतून चारा आणला जात आहे. शनिवार आणि रविवारी मिळून २० टन चारा वाटप करण्यात आला असून, सोमवारी हा आकडा १०० टनांपेक्षा जास्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पूरग्रस्तांसाठी मदत
जिल्ह्यातील साखर कारखाने, बँका आणि विविध संस्था पूरग्रस्तांसाठी मदतीला पुढे सरसावल्या आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, "बाहेरून मदत आली तर आम्ही स्वागत करू, मात्र जिल्हा प्रशासन सध्या स्वतंत्रपणे परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. आलेली प्रत्येक मदत आम्ही नियोजनपूर्वक लोकांपर्यंत पोहोचविणार आहोत."
निवारा केंद्रांची व्यवस्था
पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यात १२० निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यात एकूण १२ हजार ९५६ लोकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार,
अक्कलकोट : ३५ केंद्रे
उत्तर सोलापूर : २,८५९ लोक
करमाळा : ५६० लोक
दक्षिण सोलापूर : २४३ लोक
माढा : ५,४२६ लोक
मोहोळ : ३,८०० लोक
जनावरांचे आणि कुक्कुटपालनाचे नुकसान
पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १०३ मोठी आणि ५३ लहान जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तसेच कुक्कुटपालन केंद्रांमध्ये १८ हजार ४१ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.