सांगली : शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरीही शेतातील अनेक कामांसाठी हात अवजारांचा देखील बऱ्याच प्रमाणात वापर होतो. मानवी श्रम कमी करणाऱ्या या अवजारांमध्ये अनेक आधुनिक अवजारांची भर पडत आहे. बदलत्या शेती पद्धतीसह अवजारांचे मार्केट देखील बदलत आहे. अवजारांच्या बदलत्या मार्केटमध्ये लोखंडाला कल्पकतेने आकार देत सांगलीच्या रमेश लोहार यांनी 30 ते 35 प्रकारची अवजारे तयार करत इस्लामपूर परिसरामध्ये लौकिक मिळविला आहे. या अवजार विक्रीतून ते वर्षाला लाखोंची कमाईही करत आहेत.
advertisement
रमेश लोहार हे इस्लामपूर जवळच्या हुबालवाडी गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील सुतार काम करत होते. यामध्ये लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारची शेतीची अवजारे बनवत होते. रमेश लोहार यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले. पुण्यामध्येच खाजगी कंपनीमध्ये नोकरी करू लागले. सात वर्षांची नोकरी केल्यानंतर ते गावी परतले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
sangli farmer : 1 एकरात पिकवली 43 क्विंटल बाजरी, सांगलीच्या शेतकऱ्याचा राज्यात विक्रम
वडिलांसोबत ते यापूर्वी ही लाकडाची अवजारे तयार करत होते. वडिलांकडून त्यांनी अवजारे तयार करण्याचे कौशल्य घेतली होती. सोबतच आयटीआयचे शिक्षण असल्याने त्यातील तांत्रिक गोष्टींची देखील त्यांना माहिती होती. बदलत्या शेती पद्धतीनुसार त्यांनी लाकडी अवजारांऐवजी लोखंडी अवजारे बनवण्यास सुरुवात केली.
कुदळ, खुरपी अशा अवजारांसह ते आधुनिक टोकणी यंत्र, उसासाठी भरणी यंत्र अशी आधुनिक हात अवजारे तयार करू लागले. वेगवेगळ्या ठिकाणची प्रदर्शने ते पाहत होते. सोबतच आपली कल्पकता वापरून त्यांनी हात अवजारांमध्ये नवनवीन प्रकारची श्रम वाचवणारी अवजारे बनवण्यास सुरुवात केली. शेती उपयोगाची अवजारे तयार करत असतानाच त्यांनी स्वतः शेतामध्ये अवजार कसे काम करते आहे याबद्दलचे निरीक्षणही केले. स्वतः अवजारे वापरली आणि शेतकऱ्यांनाही ती वापरून दाखविली.
कमी श्रमामध्ये, माफक खर्चामध्ये उत्तम अवजारे मिळत असल्याने शेतकऱ्यांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. एक दोन म्हणत ते तब्बल 35 प्रकारची अवजारे आज तयार करतात. सांगली, कराड, कोल्हापूर या भागातून कच्चामाल घेतात. परिसरातील आयटीआय प्रशिक्षित दोन कामगारांच्या मदतीने ते अवजारे तयार करतात. आणि इस्लामपूर-कोल्हापूर रोड शेजारी पेठनाका येथे अवजारांची विक्री करतात.
बदलत्या शेती पद्धतीस, पीक पद्धतीस उपयुक्त ठरतील अशी आधुनिक अवजारे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेती अवजारांच्या विक्रीतून रमेश लोहार वर्षाकाठी 8 ते 10 लाखांची उलाढाल करत आहेत. शेती अवजारांचे बदलते मार्केट लक्षात घेत, अवजारे तयार करण्याच्या कल्पकतेमध्ये केलेले बदल उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.