फसवणूक झाली पण हार मानली नाही
ऋषिकेश जयसिंग धाने असं या शेतकऱ्याचे नाव असून ते दुष्काळग्रस्त सातारा जिल्ह्यातील पडाली गावचे रहिवाशी आहेत.२००० च्या सुमारास एका व्यापाऱ्याने गावात येऊन कोरफडीची शेती केल्यास लाखो रुपये मिळतील असा दावा केला. त्याच्या आकर्षक पत्रकांनी अनेक शेतकऱ्यांना भुरळ घातली. अनेकांनी हजारो रोपे घेतली, पण काही महिन्यांनी व्यापारी गायब झाला आणि सर्वांना फसवले गेल्याचे लक्षात आले. शेतकरी निराश होऊन कोरफडीची रोपे रस्त्यावर टाकू लागले. याच वेळी ऋषिकेश यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी टाकून दिलेली ४,००० कोरफडीची रोपे गोळा केली आणि आपल्या शेतात लावली.ऋषिकेश यांच्यासाठी हा छोटा प्रयोग त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
advertisement
संघर्षमय बालपण
ऋषिकेश एका साध्या शेतकरी कुटुंबात वाढले. त्यांच्याकडे आठ एकर जमीन होती, पण पावसावर अवलंबून शेतीमुळे उत्पन्न अनिश्चित होते. वडिलांचा छोटा पगार आणि कमी अन्नावर चालणारे दिवस ही त्यांची खरी वास्तवता होती. शिक्षणासाठी आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी एका मार्केटिंग कंपनीत नोकरी केली, पण ती टिकवणे कठीण गेले. नंतर त्यांनी मोरिंगा व आंब्याची रोपे विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला, पण तोही हंगामी निघाला. अशातच कोरफडीचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यांनी संधी ओळखली.
नवनवीन प्रयोग केले
ऋषिकेश यांनी कोरफडीचा वापर पारंपरिक पद्धतींऐवजी नव्या प्रयोगांसाठी केला. त्यांनी कोरफडीपासून तयार केलेले नैसर्गिक कीटकनाशक, हर्बल स्प्रेडर आणि वनस्पतींच्या वाढीस चालना देणारी उत्पादने तयार केली. त्यांनी सांगितले, “मी एकदा कोरफड माशांच्या तेलात मिसळून पिकांवर फवारली. कीटक त्याच्या कडूपणामुळे दूर पळाले. ही पद्धत अतिशय प्रभावी ठरली.” तसेच कोरफडीचा स्प्रेडर वापरल्याने केळी, ऊस यांसारख्या पिकांवर फवारणी अधिक परिणामकारक झाली.
३.५ कोटींची उलाढाल
२०१३ मध्ये ऋषिकेश यांनी आपल्या उत्पादनांना व्यावसायिक रूप दिले. मार्केटिंग क्षेत्रातील मित्रांच्या मदतीने त्यांनी ब्रँड तयार केला आणि स्थानिक तसेच राष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवला. आज त्यांच्या शेतात दोन एकरांवर कोरफडीची शेती असून, दरवर्षी सुमारे ८,००० लिटर उत्पादने तयार होतात.ज्यामध्ये नैसर्गिक कीटकनाशके, स्प्रेडर आणि हर्बल अर्क यांचा समावेश आहे. सध्या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३.५ कोटी रुपये असून, नफा जवळपास ३० टक्के आहे.
