शेती आणि शेळीपालनाचा यशस्वी जोडधंदा
शेखर यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर त्यांच्या वडिलांकडून वर्षानुवर्षे खरीप हंगामात भात आणि काही भाज्यांची लागवड केली जात असे. हीच परंपरा पुढे चालवत त्यांनी भातलागवड सुरू ठेवली असून काकडी, चिबूड, दोडका, पडवळ, भोपळा, भेंडी, मुळा आणि माठ यांसारख्या विविध भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. भाताचे उत्पादन मुख्यतः कुटुंबाच्या वापरासाठीच वापरले जाते, तर भाजीपाला गावात विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
advertisement
बागायती क्षेत्रात त्यांनी काजू लागवड केली असून ओली आणि सुकी काजू बी बाजारात विकतात. पाण्याअभावी वर्षभर लागवड शक्य नसल्याने त्यांनी शेतीसोबत शेळीपालनाला विशेष महत्त्व दिले आहे.
परफेक्ट नियोजनामुळे वाढला व्यवसाय
शेखर यांनी शेळ्यांसाठी बंदिस्त शेड बांधली असून रोज सकाळ-संध्याकाळ दोन तास शेळ्यांना चरायला सोडले जाते.नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांची चांगली वाढ होते, त्यामुळे बाहेरचे खाद्य देण्याची गरज भासत नाही. एका शेळीपासून सरासरी 7,000 ते 8,000 रुपयांचे उत्पन्न मिळते.तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या शेळ्यांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने नफा अधिक होतो.
शेळ्यांची विष्ठा (लेंडी) कंपोस्ट खत म्हणून काजू बागायतीत वापरली जाते आणि उर्वरित लेंडी गावात विकली जाते. 50 किलोच्या पोत्याला 250 रुपये दर मिळतो. हा अतिरिक्त उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरला आहे.
संकरित शेळ्यांवर विशेष भर
सुरुवातीला गावरान शेळ्यांपासून सुरू केलेल्या व्यवसायात शेखर यांनी आता संकरित जातींकडे वळण घेतले आहे. सध्या त्यांच्या कडे कोटा, शिरोळी, सोजत आणि उस्मानाबादी या उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींच्या शेळ्या आहेत. या शेळ्यांचे वजन चांगले वाढते, त्यामुळे बाजारात त्यांना उत्तम भाव मिळतो.
काजू विक्रीतही अभ्यासपूर्वक निर्णय
काजू उत्पादन सुरू झाल्यानंतर शेखर यांनी ओली आणि सुकी बीची विक्री केली असून, सुकी काजू बी केवळ बाजार दर वाढल्यावरच विकतात. बदलत्या हवामानाचा काजूवर परिणाम होत असला तरी कंपोस्ट खताच्या वापरामुळे उत्पादन समाधानकारक मिळत आहे.
नोकरी सोडून स्वावलंबनाचा मार्ग
शेखर सांगतात की, “पदवी घेतल्यानंतर जरी दोन वर्षे नोकरी केली, तरी शेती आणि पशुपालनाची आवड मनात कायम होती. संकरित जातींच्या शेळ्यांची वाढ जलद होते, वजन चांगले भरते आणि बाजारात मागणीही जास्त असते. त्यामुळे व्यवसायात चांगला नफा मिळतो. पुढे हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा माझा मानस आहे.” शेखर श्रृंगारे यांनी मेहनत, नियोजन आणि आधुनिक शेतीपद्धतींचा योग्य वापर करून ग्रामीण पातळीवर स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.
