जालना : रेशीम बाजारात रेशीम कोषांना चांगला दर मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. मराठवाड्यातील सगळ्यात मोठी रेशीम बाजारपेठ म्हणून जालना शहरातील रेशीम बाजारपेठेची ओळख आहे. सध्या रेशीम बाजारपेठेमध्ये रेशीम कोषांची आवक घटली आहे. त्याचबरोबर रेशीम धाग्याला चांगली मागणी आहे. यामुळे रेशीम कोषांचे दर वधारले आहेत. रेशीमचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पाहुयात जालना रेशीम बाजारात रेशीम कोषांना किती दर मिळतोय आणि आगामी काळात रेशीम कोष दराची स्थिती कशी असेल.
advertisement
चार महिन्यापूर्वी शहरातील रेशीम बाजारपेठेमध्ये रेशीम कोषांची मोठ्या प्रमाणावर आवक होती. वाढलेली आवक आणि रेशीम धाग्यांना मंदावलेली मागणी यामुळे रेशीम कोष दर दबावात होते. आता मात्र रेशीम कोष दरामध्ये सुधारणा झाली असून रेशीम कोषांची घटलेली आवक आणि रेशीम धाग्याला मागणी झालेली वाढ ही दरवाढी मधील कारणे असल्याचे रेशीम कोषांचे लिलाव करणारे कर्मचारी किशोर गोल्डे यांनी सांगितले. त्याचबरोबर रेशीम कोषांना मध्यंतरी मिळत असलेला कमी दर यामुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळले आहेत. त्यामुळे रेशीम शेती देखील कमी प्रमाणात होत आहे, असं गोल्डे यांनी सांगितलं.
हिवाळ्यात सुका मेवा महागला, गोडंबी अन् खोबऱ्याच्या दरात मोठी वाढ, काय आहेत भाव?
जालना बाजारात सध्या पाच क्विंटल पासून ते 20 क्विंटल पर्यंत रेशीम कोषांची आवक होत आहे. या रेशीम धाग्यांना कमीत कमी 350 रुपये प्रति किलो तर जास्तीत जास्त 675 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे तर सरासरी 610 प्रति किलो दर रेशीम कोषांना मिळत आहे. रेशीम कोषांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत मात्र रेशीम शेती करताना काटेकोर नियोजन करावे लागते. या नियोजनात थोडी जरी चूक झाली तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. उत्पन्न घटल्याने रेशीम कोषांच्या दरात वाढ झाल्याचे शेतकरी अण्णा गवळी यांनी सांगितलं.
दरम्यान, रेशीम शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी अण्णा गवळी यांनी मागील बॅचमध्ये रेशीम आळ्या कोष निर्मिती करत नसल्याने मोठ नुकसान झाल्याचंही बोलताना सांगितलं.





