पाण्याची जुळवाजुळव अन् आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
कळंबवाडीपासून 5 किमी अंतरावर असलेल्या विहिरीतून पाइपलाइनद्वारे पाणी आणून त्याचे ड्रीपद्वारे व्यवस्थापन करण्याची व्यवस्था जाधव यांनी स्वतः केली. पाण्याच्या कमतरतेतही कारल्याचे पीक तग धरण्यासाठी त्यांनी योग्य प्रमाणात पाण्याची नियोजनबद्ध वाटप व्यवस्था उभारली. त्यांच्या शेतात एका रोपाला 24 तासांत 8 लिटर पाणी नेमकेपणे उपलब्ध होते. त्यामुळे पीक वाढीस मोठी मदत झाली.
advertisement
पूर्णपणे शेणखतावर भर
रासायनिक खतांऐवजी जाधव यांनी शेणखतावर पूर्णपणे भर दिला. स्वतःकडे असलेल्या गायींपासून मिळालेल्या तब्बल 10 ट्रेलर शेणखताची त्यांनी जमिनीत योग्य प्रमाणात नांगरणी करून मिसळणी केली. यामुळे मातीची पोत सुधारली, उत्पादनक्षमता वाढली आणि रोगराईचा प्रश्नही कमी झाला.
द्राक्षबागेच्या जागी सुरु केले कारले
जाधव यांच्या 25 एकर शेतीपैकी 4 एकर कांदा, 1 एकर दोडका, दीड ते 2 एकर कारले आणि उर्वरित क्षेत्रात गहू ज्वारी घेतली जाते. काही काळापूर्वी त्यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले होते. परंतु मांडव काढून टाकण्याऐवजी त्यांनी त्यावर दोडका, भोपळा घेत प्रयोग केले आणि त्यानंतर कारल्याची बाग लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे आधीचे बांधकाम व सुविधा याचाच उपयोग होऊन खर्चही कमी झाला. हिवाळ्यात कारल्यावर कीड येण्याचा धोका असतो. मात्र शेणखताचा भरपूर वापर, योग्य सिंचन आणि नियमित देखभाल यांच्या जोरावर त्यांनी हा धोका मोठ्या प्रमाणात टाळला.
अडीच महिन्यांत उत्पादनाला सुरुवात
सुरुवातीला 2 एकरांवर कारल्याची लागवड करण्यात आली. अतिवृष्टीमुळे अर्धा एकर क्षेत्राचे नुकसान झाले, तरी उर्वरित दीड एकरात उत्पादन चांगले मिळू लागले. अवघ्या अडीच महिन्यांत कारल्याची तोड सुरू झाली. त्यांच्या बागेत दिवसाआड कारल्याची तोड होते आणि प्रत्येक तोडीत 450 ते 500 किलो माल मिळतो.
महिन्याला 5 ते 6 लाख रुपये
सध्या बाजारपेठेत कारल्याची मागणी वाढलेली आहे. दीपक जाधव यांनी आधीच बाजारभाव आणि मागणीचा अभ्यास केल्याने त्यांनी उत्पादन योग्य वेळी बाजारात आणले. एका तोडीत मिळणाऱ्या कारल्याचे सुमारे 30 हजार रुपये मिळतात. दिवसाआड तोड असल्याने महिन्याला हे उत्पन्न साडेचार ते पाच लाखांपर्यंत पोहोचते. काही दिवस चांगले दर मिळाल्यास 6 लाखांपर्यंतही उत्पन्न जाते.
एकूणच, सहजपणे हार न मानता वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्यास कमी क्षेत्रातही मोठे उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दीपक जाधव. पाण्याची तुटवड्याची परिस्थिती, अतिवृष्टीचे नुकसान आणि बाजारातील चढउतार यांचा सामना करत त्यांनी शेतीला नफ्याच्या मार्गावर नेले आहे. त्यांच्या पद्धती शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
