मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात राहणारे नवनाथ महादेव हराळे हे पदवीधर शेतकरी आहेत. 2020 साली नवनाथ यांनी 350 रोपांची लागवड करत डाळिंब शेतीला सुरुवात केली. अर्ध्या एकर लागवड केलेल्या डाळिंब शेतीतून त्यांना चांगलं उत्पन्न निघालं. तेव्हा सर्व खर्च वजा करून दोन ते तीन लाखाचा नफा झाला होता. मग नवनाथ यांनी डाळिंब शेतीवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
गेल्या चार ते पाच वर्षापासून नवनाथ हराळे हे भगवा जातीच्या डाळिंबाची शेती करत आहे. दीड एकरात त्यांनी 420 डाळिंबांच्या रोपांची लागवड केली. यासाठी त्यांना जवळपास 80 हजार ते 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च आला आहे. दीड एकरातून त्यांना डाळिंबाचे पाच टनाचे उत्पन्न मिळाले आहे. तर सर्व खर्च वजा करून पाच ते सहा लाखाचा नफा राहिल्याचं हराळे यांनी सांगितलं.
हराळे यांनी डाळिंब शेतीची योग्य ती माहिती घेऊन नियोजनबद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली. आता त्यांनी नव्यानं दीड एकरात डाळिंगाची लागवड केलीये. पहिलं वर्ष असल्याने उत्पन्न कमी निघालं. परंतु, पुढील काळात आठ टनांपर्यंत उत्पन्न निघणार आहे. तेव्हा चांगली कमाई होईल, असं शेतकरी नवनाथ सांगतात.
दरम्यान, शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात डाळिंबाची लागवड जास्तीत जास्त करावी. कारण डाळिंबाला परदेशात सुद्धा चांगली मागणी असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना डाळिंबाची शेती नक्कीच परवडते, असंही नवनाथ हराळे अनुभवावरून सांगतात.