सोलापूर : झेंडूची फुलं म्हटलं की आपल्याला आठवतो दसऱ्याचा काळ. शेतकरीही या काळात त्याचं मोठं उत्पन्न घेतात. पण शक्यतो मातीमोल भावानंच या फुलांची विक्री होते. पण केवळ दसऱ्यात नव्हे तर इतर वेळीही झेंडूची शेती लाखोंचं उत्पन्न देणारी ठरू शकते. सोलापूरातील जिल्ह्यातील शेतकरी गणेश नागटिळक यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते झेंडू फुलाची शेती करत आहेत. यासाठी लागवडीला 50 ते 60 हजार रुपये खर्च येत असून या फुल विक्रीतून त्यांना सर्व खर्च वजा करून 2 ते 3 लाख रुपयांचं उत्पन्न वर्षाला मिळत आहे.
advertisement
मोहोळ तालुक्यातील पापरी या गावातील दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी गणेश नागटिळक हे गेल्या 5 वर्षांपासून झेंडू फुलाची शेती करत आहेत. एका एकरात त्यांनी अंबर नावाच्या झेंडूच्या फुलाची लागवड केली आहे. सध्या मार्केटमध्ये झेंडूच्या फुलाला सरासरी 30 रुपये ते 50 रुपये किलो दराने भाव मिळत आहे.
पारंपरिक पिकांच्या मागे न लागता केला नवीन प्रयोग, अडीच लाखांचं उत्पन्न, शेतकऱ्यानं काय केलं?
झेंडूवर भुरी आणि करप्या अशा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे साधारणपणे आठ दिवसांनी औषध फवारणी करावी लागते. इतर शेती तोट्यात येऊ शकते पण फुलशेती कधीही तोट्यात येत नाही. कारण झेंडूच्या फुलाचा चार दिवसाला एक ते दीड टनाचा तोडा होतो. तर एका तोड्यातून शेतकरी गणेश यांना 25 हजार रुपये मिळत आहेत. लेबर खर्च, वाहतुकीचा खर्च व इतर खर्च वजा केल्यास एका तोड्यातून 20 हजार रुपयेपर्यंत नफा शेतकरी गणेश यांना मिळत आहे.
लागवड, औषध फवारणी, तोडणी अशा सर्वांसाठी झेंडू पिकाला एका एकराला साधारणता 50 ते 60 हजार रुपये पर्यंत खर्च येतो. तर त्यातून सरासरी 2 ते 3 लाख उत्पन्न वर्षाला मिळत असल्याची माहिती शेतकरी गणेश नागटिळक यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी इतर शेतीपेक्षा फुलशेती कधीही चांगली राहील. शेती करताना विचारपूर्वक आणि नियोजन करून फुलशेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल असा सल्ला शेतकरी गणेश नागटिळक यांनी दिला आहे.