सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. यामुळे भारतातील सोयाबीन दर सुधारले आहेत. त्याचबरोबर पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेंडेला चांगली मागणी आहे. बाजारात सोयाबीनचा पुरवठा देखील घटला आहे. आवक कमी झाल्याने मागणी वाढली आहे. परिणामी दरात तेजी पहायला मिळत आहे.
advertisement
तर दुसरीकडे केंद्र सरकारने सोयाबीन हमीभावात घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे देखील सोयाबीन दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर आगामी काळात सण-उत्सव मोठ्या प्रमाणात आहेत. उत्सव काळात सोयाबीन तेलाला मागणी वाढते. त्यामुळे दरावर परिणाम झाला असल्याचे व्यापारी संजय कानडे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
दरम्यान, सध्या शेतकऱ्यांकडील सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे. आणखी महिनाभरात सोयाबीन आवक सुरू होईल. परंतु, तेव्हाचे मागणी आणि पुरवठा गणित यावर सोयाबीन दराचे भवितव्य अवलंबून असल्याचे देखील जालना येथील आडत व्यापारी संजय कानडे यांनी सांगितले.





