राज्यात गेल्या काही काळात तापमानात मोठी वाढ झालीये. कोकणात 4-5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेचा पारा चांगलाच चढणार आहे. 7 मार्च ते 13 मार्च काळात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या काळात तापमानाचा पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:सोबतच पिकांची आणि प्राण्यांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
कोकणात उष्णतेची लाट, नागपूरही तापलं, पुढील 24 तासांसाठी अलर्ट
पिकांची काळजी कशी घ्यावी?
वाढत्या तापमानाचा कोकणातील फळ बागांवर परिणाम होत आहे. यामध्ये आंबा, काजूचा मोर सुकतो, परिपक्व फळं गळतात. तसेच फळे करपतात. हे सगळं कोकण विभागात उष्णतेमुळे जाणवत आहे. तर आंबा आणि चिकू फळाची गुणवत्ता खालावते, पक्व झालेला चवळी, मुग, वाल, हरभरा कडधान्य पिकांच्या शेंगा फुटताना दिसतात. फळ बाग आणि पिकांमध्ये पाण्याचा ताण दिसू शकतो. दुपारच्या तीव्र उष्णतेमुळे आंबा आणि काजू कलमांची साल फुटू शकते यासाठी झाडाला बोर्डोपेस्ट लावावी. बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला पिकांत भाताचा पेंढा किंवा काडी कचऱ्याच अच्छादन करावं. तसेच गरजेनुसार सकाळी आणि सायंकाळी पिकांना पाणी द्यावं, असं साबळे सांगतात.
प्राण्यांची काळजी कशी घ्यावी?
उष्णतेपासून जनावरंच्या संरक्षणासाठी शेडच्या छतावर गवताने अच्छादन करावे. जनावरांना ताजे, स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी द्यावे. तसेच त्यांच्या चारा पाण्याची योग्य ती काळजी घ्यावी, असेही शास्त्रज्ञ सांगतात.
माणसांसाठी सल्ला
वाढत्या उष्णतेत नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. शक्यतो भर उन्हात दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. तहान लागली नसली तरी मुबलक पाणी प्यावे. हलके, पातळ आणि सच्छिद्र कपडे वापरावे. घराबाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट यांचा वापर करावा. उन्हात काम करताना डोक्यावर टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करावा. शरीरातील पाणी कमी होत असल्याचे वाटल्यास लिंबू पाणी, ताक, सरबत घ्यावे. डोकेदुखी किंवा घाम येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले.





