किती मिळणार मदत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २९ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा उभे राहावे यासाठी सरकारने मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. डोंगरी भागातील घरांना १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पूरात मृत्यूमुखी पडलेल्या दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार रुपये, तर खरडून गेलेल्या शेतीजमिनींसाठी ४२ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाईल.
advertisement
याशिवाय, प्रति विहीर ३० हजार रुपये, ग्रामीण भागातील बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी, तसेच रब्बी हंगामासाठी बियाण्यांसाठी अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे. विमा असलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार रुपये प्रति हेक्टर, कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये, तर बागायती शेतीसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.
अतिवृष्टीमागील कारणे
हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढ (Global Warming) हे अतिवृष्टीमागील प्रमुख कारण आहे. वाढत्या उष्णतेमुळे पावसाची पद्धत पूर्णपणे बदलली असून, पूर्वी महिनाभर हळूहळू पडणारा पाऊस आता काही तासांतच कोसळतो. तसेच जंगलतोड, नद्यांवरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर शहरीकरणामुळे जलप्रवाह अडवला जातो आणि पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पूरस्थिती निर्माण होते.
शेतीवर गंभीर परिणाम
पूरामुळे शेतीतील वरची सुपीक माती वाहून गेल्याने जमिनीची उर्वरता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामापूर्वी जमीन पुन्हा तयार करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि उत्पन्न घटेल. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या मदतीशिवाय पर्याय नाही.