मुंबई : जागतिक राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण करणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्द ट्रम्प यांनी घेतला आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेत, अशा देशांवर अमेरिकेसोबत व्यापार करताना 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली असून भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसारख्या देशांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
ट्रम्प काय म्हणाले?
न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन येथे दिलेल्या वक्तव्यात ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जे देश इराणच्या सत्ताधाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळ देतात, त्यांना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल.” इराणवर लादलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे मानले जात आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारत, चीन, तुर्किये, यूएई, पाकिस्तान आणि आर्मेनिया यांचा समावेश आहे.
..तर अमेरिकेला परिणाम भोगावे लागणार
या निर्णयावर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचा हा एकतर्फी निर्णय जागतिक व्यापार व्यवस्थेस धक्का देणारा असून याचे गंभीर परिणाम अमेरिकेलाच भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध आधीच तापलेले असताना, या नव्या टैरिफमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारताची चिंता वाढली
भारतासाठी ही घोषणा विशेष चिंतेची मानली जात आहे. कारण अमेरिकेने यापूर्वीच भारतावर विविध उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात टैरिफ लादले आहेत. काही क्षेत्रांमध्ये हे टैरिफ 50 टक्क्यांपर्यंत गेले असून, ते जागतिक पातळीवरील उच्चांकी दरांपैकी मानले जातात. यामध्ये रशियाकडून आयात होणाऱ्या तेलावर लावण्यात आलेल्या २५ टक्के टैरिफचाही समावेश आहे. आता इराणशी व्यापार सुरू ठेवल्यास आणखी 25 टक्के अतिरिक्त शुल्क लागण्याची शक्यता असल्याने भारतीय निर्यातदार आणि उद्योग क्षेत्रात अस्वस्थता आहे.
मात्र, भारतीय निर्यातदारांची सर्वोच्च संघटना ‘फियो’ (FIEO) यांनी या निर्णयामुळे भारताच्या व्यापारावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही, असा दावा केला आहे. फियोनुसार, भारतीय कंपन्या अमेरिकेच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करत आहेत. भारत आणि इराणमधील बहुतांश व्यापार हा अन्नधान्य आणि औषधांपुरताच मर्यादित आहे, जे मानवीय कारणांमुळे निर्बंधांच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे तातडीचा मोठा फटका बसणार नाही, असा विश्वास फियोने व्यक्त केला आहे.
भारत इराणकडून काय आयात निर्यात करतो?
आकडेवारीनुसार, 2024 -25 या आर्थिक वर्षात भारत-इराण एकूण व्यापार सुमारे 1.68 अब्ज डॉलर इतका आहे. यामध्ये भारताची निर्यात सुमारे 1.24 अब्ज डॉलर असून आयात सुमारे 0.44 अब्ज डॉलर इतकी आहे. भारत इराणकडून प्रामुख्याने सुका मेवा, सेंद्रिय व असेंद्रिय रसायने, काचेच्या वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. तर भारताकडून इराणला तांदूळ, सोयाबीन, केळी, चहा, साखर, औषधे, मसाले, मशिनरी आणि कृत्रिम दागिन्यांची निर्यात केली जाते.
