मुंबई : भारतीय शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. केंद्र सरकारने कृषी यंत्रसामग्रीवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी २२ सप्टेंबर २०२५ पासून झाली आहे. या निर्णयामुळे ट्रॅक्टर, कापणी यंत्रे, थ्रेशर, पॉवर टिलर, सीडर यांसारख्या यंत्रसामग्रीच्या किमती थेट ७ ते १३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. परिणामी शेतीचे आधुनिकीकरण अधिक वेगाने होईल आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होईल.
advertisement
यंत्रसामग्रीच्या किंमती कमी
GST कपातीमुळे विविध उपकरणांच्या किमतींमध्ये हजारो रुपयांची घट झाली आहे.
पॉवर टिलर : (१३ एचपी) पूर्वी १,९०,००० रुपये होता, आता तो १,७८,१२५ रुपयांत मिळेल. म्हणजेच सुमारे ११,८७५ रुपयांची बचत.
भात लावणी यंत्र : (४ लाईन) आधी २,४६,४०० रुपये होते, आता २,३१,००० रुपयांत उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना १५,४०० रुपयांचा दिलासा मिळेल.
बहुपीक थ्रेशर : (४ टन/तास क्षमता) २,२४,००० रुपयांवरून २,१०,००० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. म्हणजे १४,००० रुपयांचा फायदा.
कंबाईन हार्वेस्टर : (१४ फूट कट बार) याची किंमत ३० लाखांवरून २८.१२ लाखांपर्यंत खाली आली असून शेतकऱ्यांना जवळपास १.८७ लाख रुपयांचा मोठा दिलासा मिळाला आहे.
रोटाव्हेटर : (६ फूट) १,२५,००० रुपयांवरून १,१७,१८७ रुपयांवर आला आहे. म्हणजेच ७,८१२ रुपयांची बचत. याच धर्तीवर इतर अनेक यंत्रांमध्ये देखील किंमत घट झाली आहे.
कृषी मंत्रालयाचे आवाहन
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १९ सप्टेंबर रोजीच GST कपातीची घोषणा केली होती. त्यांनी स्पष्ट केले की, या कपातीचा थेट फायदा शेतकऱ्यांना पोहोचवणे हे उत्पादक कंपन्यांचे कर्तव्य आहे. यामुळे उपकरणे केवळ खरेदीसाठीच स्वस्त होणार नाहीत तर कस्टम हायरिंग सेंटर्स (CHCs) कडून भाड्याने घेण्याचे दरही कमी होतील.
सरकारी योजनांचा लाभ
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आधीपासूनच कृषी यांत्रिकीकरण उप-मिशन (SMAM) राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशभरात सुमारे ३०,००० CHCs कार्यरत असून शेतकऱ्यांना आवश्यक उपकरणे भाड्याने दिली जातात. याशिवाय शेतकऱ्यांना उपकरणे खरेदी करताना ४० ते ५० टक्के अनुदान देखील दिले जाते. GST कपात झाल्यामुळे या योजनांचा परिणाम अधिक व्यापक होईल.