Rajmata Jijau: रंग खेळताना ते एक वाक्य तोंडून निघालं अन् ठरलं! जिजाऊ शहाजीराजेंच्या लग्नाची गोष्ट, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Rajmata Jijau Jayanti: सर्वांच्या साक्षीने रंगमहालात घडलेल्या या प्रसंगाची मोठी चर्चा झाली. पुढे लखोजीराव यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जिजाऊंचा शहाजीराजेंसोबत विवाह झाला.
बुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा तेजस्वी पुत्र घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आज उत्साहात साजरी केली जात आहे. राजमाता जिजाऊ यांच्या बालपणीच्या असंख्य आठवणींची साक्ष देणारा लखोजीराव जाधव यांचा राजवाडा आजही सिंदखेडराजा इथे आहे. या गावात आणि परिसरात जिजाऊ यांचे बालपण गेले. इथेच त्यांच्या लग्नाची बोलणी झाली. तो प्रसंग इतिहासकार विनोद ठाकरे यांनी लोकल18 सोबत बोलताना जिवंत केला.
जिजाऊ तेव्हा केवळ 6 वर्षांच्या होत्या. रंगपंचमीचा दिवस होता. राजवाड्याच्या बाजूलाच असलेल्या एका नुतन वास्तूमध्ये लखोजीराव जाधव यांना रंग लावण्यासाठी वतनदार मंडळी जमली होती. वेरूळचे पंच हजारी मनसबदार मलोजीराजे देखील या प्रसंगी बाल शहाजी यांच्यासह हजर होते. मोठ्या मंडळींची विविध विषयांवर चर्चा सुरू असतानाच बालसुलभ जिजाऊ आजूबाजूला बागडत होत्या. जिजाऊ यांना रंग लावावा या हेतूने 8-9 वर्षांचे शहाजी जिजाऊ यांच्या मागे धावू लागले.
advertisement
रंग लावण्यासपासून वाचावे यासाठी जिजाऊ आपल्या वडिलांच्या लखोजीराजे यांच्या मांडीवर जाऊन बसल्या. तेव्हा धावत आलेल्या शहाजी यांनाही लखोजीराव यांनी आपल्या मांडीवर घेतले. दोन्ही मांडीवर दोन बालसुलभ चेहरे एकमेकांना न्याहाळत होते. लखोजीरावांनी दोघांकडे पाहिलं अन् आपसूकच त्यांच्या तोंडून शब्द निघाले, “काय लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय” त्यांच्या या वाक्यांचा धागा पकडून मालोजी राजे म्हणाले, “काय मग लखोजीराव आम्ही पक्कं समजायचं का?” यावर लखोजीराव उद्गारले, “ठरलं तर, जिजाऊ तुम्हाला दिली”
advertisement
सर्वांच्या साक्षीने रंगमहालात घडलेल्या या प्रसंगाची मोठी चर्चा झाली. पुढे लखोजीराव यांनी आपल्या दिलेल्या शब्दाप्रमाणे पंच हजारी मनसबदार असलेल्या मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजी यांना आपली मुलगी जिजाऊ दिली. छत्रपती संभाजीनगर येथे देवगिरी किल्ल्यावर मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
दरम्यान, लखोजीराव हे 25 हजारी तर मालोजी हे 5 हजारी मनसबदार होते. लखोजीराव तसे पाहिल्यास उच्च पदावर असताना देखील त्यांनी या विवाहाची संमती दिली ही विशेष बाब असल्याचे इतिहास अभ्यासक विनोद ठाकरे विशेषत्वाने सांगतात.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 1:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Rajmata Jijau: रंग खेळताना ते एक वाक्य तोंडून निघालं अन् ठरलं! जिजाऊ शहाजीराजेंच्या लग्नाची गोष्ट, Video







