जिजाऊ तेव्हा केवळ 6 वर्षांच्या होत्या. रंगपंचमीचा दिवस होता. राजवाड्याच्या बाजूलाच असलेल्या एका नुतन वास्तूमध्ये लखोजीराव जाधव यांना रंग लावण्यासाठी वतनदार मंडळी जमली होती. वेरूळचे पंच हजारी मनसबदार मलोजीराजे देखील या प्रसंगी बाल शहाजी यांच्यासह हजर होते. मोठ्या मंडळींची विविध विषयांवर चर्चा सुरू असतानाच बालसुलभ जिजाऊ आजूबाजूला बागडत होत्या. जिजाऊ यांना रंग लावावा या हेतूने 8-9 वर्षांचे शहाजी जिजाऊ यांच्या मागे धावू लागले.
advertisement
रंग लावण्यासपासून वाचावे यासाठी जिजाऊ आपल्या वडिलांच्या लखोजीराजे यांच्या मांडीवर जाऊन बसल्या. तेव्हा धावत आलेल्या शहाजी यांनाही लखोजीराव यांनी आपल्या मांडीवर घेतले. दोन्ही मांडीवर दोन बालसुलभ चेहरे एकमेकांना न्याहाळत होते. लखोजीरावांनी दोघांकडे पाहिलं अन् आपसूकच त्यांच्या तोंडून शब्द निघाले, “काय लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय” त्यांच्या या वाक्यांचा धागा पकडून मालोजी राजे म्हणाले, “काय मग लखोजीराव आम्ही पक्कं समजायचं का?” यावर लखोजीराव उद्गारले, “ठरलं तर, जिजाऊ तुम्हाला दिली”
सर्वांच्या साक्षीने रंगमहालात घडलेल्या या प्रसंगाची मोठी चर्चा झाली. पुढे लखोजीराव यांनी आपल्या दिलेल्या शब्दाप्रमाणे पंच हजारी मनसबदार असलेल्या मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजी यांना आपली मुलगी जिजाऊ दिली. छत्रपती संभाजीनगर येथे देवगिरी किल्ल्यावर मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
दरम्यान, लखोजीराव हे 25 हजारी तर मालोजी हे 5 हजारी मनसबदार होते. लखोजीराव तसे पाहिल्यास उच्च पदावर असताना देखील त्यांनी या विवाहाची संमती दिली ही विशेष बाब असल्याचे इतिहास अभ्यासक विनोद ठाकरे विशेषत्वाने सांगतात.





