अनुदान थेट खात्यात जमा
शासनाच्या नियोजनानुसार, ‘फार्मर आयडी’ असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल. या अनुदानासाठी कोणतीही स्वतंत्र अर्ज प्रक्रिया आवश्यक नाही. तथापि, जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही सुमारे १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी तयार केलेला नाही. त्यामुळे त्यांना पुढील हप्त्यात किंवा आयडी तयार झाल्यानंतरच लाभ मिळणार आहे.
advertisement
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी पूर्ण झाला आहे, त्यांना पुढील आठवड्यात अनुदान मिळणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी तत्काळ ‘अॅग्रिस्टॅक पोर्टल’वर जाऊन फार्मर आयडी तयार करावा,” असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘अॅग्रिस्टॅक आयडी’ का आवश्यक?
शासनाच्या नव्या ‘अॅग्रिस्टॅक प्रकल्पा’ अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जात आहे. हा क्रमांक म्हणजे शेतकऱ्याची डिजिटल ओळख, ज्यामध्ये जमीन, पीक, अनुदान, विमा, पाणीपुरवठा आणि इतर कृषी सेवांची माहिती एकत्रित केली जाते.
पूर्वी शेतकऱ्यांना दरवेळी अनुदान किंवा विम्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया करावी लागत होती. आता अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी असल्यास स्वतंत्र केवायसी करण्याची गरज नाही. अनुदान,विमा किंवा मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
फार्मर आयडी कसा मिळवायचा?
ज्यांच्याकडे अजून फार्मर आयडी नाही त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे
आधारकार्ड
७/१२ उतारा किंवा जमीन नोंद
बँक पासबुकची प्रत
मोबाईल क्रमांक
दरम्यान, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला अॅग्रिस्टॅक क्रमांक आणि फार्मर आयडी मिळतो. हा क्रमांक भविष्यातील सर्व शासकीय योजना, अनुदान आणि विमा लाभांसाठी आवश्यक असेल.
