बुलढाणा : यंदाच्या खरीप हंगामात चांगल्या भावाच्या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, कमी कालावधीच्या वाणाचे सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागल्यावर शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. नव्या सोयाबीनमधील जास्त आर्द्रतेमुळे (मॉईश्चर) अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात असल्याची खंत व्यक्त होत आहे.
advertisement
खामगाव बाजार समितीतील परिस्थिती
शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या नव्या सोयाबीनला केवळ ३५०० रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळाला. हा भाव अत्यल्प असल्याने अनेक शेतकरी माल विकण्याऐवजी परत घेऊन गेले. व्यापाऱ्यांनी नमूद केले की, सध्या बाजारात आलेल्या नव्या सोयाबीनमधील ओलावा २४ ते २५ टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे व्यापारी जास्त दर देण्यास तयार नाहीत.
शेतकऱ्यांची नाराजी
शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “सोयाबीन घेण्यासाठी आम्ही कित्येक महिने मेहनत केली. पावसाच्या तडाख्यातून पीक वाचवले. पण आता एवढ्या कमी दरात माल विकणे शक्य नाही. सरकारने सोयाबीनसाठी आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात व्यापारी मनमानी करत आहेत.”
जुन्या सोयाबीनला जास्त भाव
याच बाजार समितीत जुन्या सोयाबीनला मात्र अधिक दर मिळत आहेत. शनिवारी जुन्या मालाला किमान ३४०० रुपये ते जास्तीत जास्त ४३२५ रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ३८६२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे नोंदवले गेले. त्यामुळे नव्या व जुन्या सोयाबीनच्या भावात मोठी तफावत दिसून आली.
ऑक्टोबरमध्ये आवक वाढणार
सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात दाखल होईल. त्यावेळी नैसर्गिकरीत्या दाण्यातील आर्द्रता कमी होईल आणि त्यामुळे दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, शेतकऱ्यांनी पिकातील ओलावा योग्य प्रमाणात घटल्याशिवाय माल बाजारात आणू नये. अन्यथा तोटा होण्याची शक्यता जास्त आहे.