मुंबई : महाराष्ट्राला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागांमध्ये शेतकरी आणि नागरिक संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
advertisement
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबरपासून २९ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः २७ सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशसह सर्वच भागात पावसाचा प्रभाव राहील. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मच्छिमार बांधवांसाठीही हवामान विभागाने इशारा दिला आहे. पुढील काही दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात उभी पिकं पाण्याखाली गेली असून खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत शेतजमिनी पाण्याखाली आहेत. विदर्भात कापूस आणि सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. शाळा, मंदिरं आणि ग्रामपंचायत कार्यालयं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत.
सरकार आणि विरोधकांचा दौरा
पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तातडीच्या मदतीची हमी दिली. तर, उद्धव ठाकरे यांनीही आज मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. “हे संकट मोठं आहे, पण शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये,” असं आवाहन त्यांनी केलं.
पुढची ५ दिवस संकटमय
हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार नाही. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी, मच्छिमार आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
