कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी आपली शेतजमिनीतील वाटणी शेतीत दिवस-रात्र राबणाऱ्या मोठ्या भावाच्या नावावर करून एक मोठा त्याग केला आहे. हा निर्णय त्यांनी आपल्या आई वत्सलाबाई शिरसाट यांच्या 81 व्या वर्षी साजऱ्या करण्यात आलेल्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात जाहीर केला. उपस्थित ग्रामस्थ, आप्तस्वकीय आणि नातेवाईकांसाठी हा सोहळा एक भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव ठरला.
advertisement
संस्कार, त्याग आणि कृतज्ञतेचं दर्शन
शिरसाट कुटुंबातील दिवंगत माणिकराव शिरसाट हे पंढरीचे नित्य वारकरी होते आणि त्यांनी सव्वातीन एकर कोरडवाहू जमिनीतून आपल्या तीन मुलांचं पालनपोषण केलं. त्यांचे मोठे अपत्य मधुकर शिरसाट यांनी कोळसांगवी येथे सालगडी म्हणून काम करत लहान भावाच्या शिक्षणाचा खर्च उचलला. याच आधारावर उद्धव यांना कृषीशास्त्रात उच्च शिक्षण घेता आले आणि पुढे ते कृषी संशोधक म्हणून देश-विदेशात कार्यरत झाले.
आज स्वतःच्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही उद्धव शिरसाट यांनी कुटुंबाच्या त्यागाची आठवण ठेवत मोठ्या भावाचा सन्मान केला. आपल्या जमीन हिस्स्याचा हक्क त्याग करून त्यांनी मधुकर शिरसाट यांच्या नावावर जमीन केली. या निर्णयाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.
आईच्या उपस्थितीत हक्कसोडचा दस्तऐवज
सोहळ्यात उद्धवराव शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आज माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या आई-वडीलांच्या आणि भावाच्या त्यागामुळेच आहे. त्यामुळे माझं नैतिक कर्तव्य आहे की, त्यांच्या साक्षीने मी माझ्या हक्काचा त्याग करावा.” त्याच वेळी त्यांनी अधिकृतपणे हक्कसोड पत्र करून देत भावाला जमिनीचा अधिकार दिला.
सामाजिक संदेश देणारा सोहळा
यावेळी कीर्तनकार अतुल महाराज शास्त्री यांनी मातृऋण, बंधुत्व आणि कृतज्ञतेच्या भावनेवर प्रभावी कीर्तन सादर केलं. तर आभारप्रदर्शन करताना उद्धवराव यांनी आपल्या जीवनप्रवासात आई-वडिलांनी व मोठ्या भावाने दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मोठ्या भावाच्या त्यागाशिवाय मी आज इथं पोहोचूच शकलो नसतो.”
जमिनीवरून अनेक कुटुंबांमध्ये भांडणं होत असताना, शिरसाट कुटुंबाने दिलेला हा संदेश समाजासाठी मार्गदर्शक ठरतो. त्याग, आदर आणि कृतज्ञता यांवर आधारलेला हा निर्णय नक्कीच एक नवा संस्कार आणि सामाजिक मूल्यांचा वस्तुपाठ आहे.
