मुंबई : ताज्या भाजीपाल्याचा सुगंध, रंगीबेरंगी फळांची रांग, फुलांचा दरवळ आणि धान्यांनी भरलेली टोपली पाहिली की अनेकांना बाजारात फेरफटका मारल्याशिवाय समाधान मिळत नाही. प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू निवडण्याचा अनुभव हा केवळ खरेदीपुरता मर्यादित नसून तो मनाला प्रसन्न करणारा, तणाव कमी करणारा ठरतो, असेही आता मानले जाऊ लागले आहे. मात्र, झपाट्याने वाढणाऱ्या महानगरांमध्ये अशा पारंपरिक बाजारपेठांपर्यंत पोहोचणे अनेकांसाठी कठीण होत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनाही खात्रीशीर व्यासपीठ नसल्याने शहरात माल आणताना अतिरिक्त खर्च आणि जोखीम उचलावी लागते.
advertisement
हीच दरी ओळखून पुण्यातील वृंदा बोरकर यांनी ‘विंग्रो मार्केटस्’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली. गावातील शेतकरी आणि शहरातील ग्राहक यांच्यात थेट दुवा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. विविध भागांतील शेतकऱ्यांचे गट तयार करून, शहरातील नागरिकांना घराजवळच ताजा, शुद्ध आणि विश्वासार्ह भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये, फुले तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम विंग्रो मार्केट सातत्याने करत आहे.
2017 साली घेतला निर्णय
2017 साली सुरू झालेल्या विंग्रो मार्केट्सच्या संचालक वृंदा बोरकर यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून एम.टेक. पदवी प्राप्त केली आहे. त्या SINE IIT बॉम्बेच्या NIDHI EIR फेलोशिप प्राप्त उद्योजिका आहेत. त्यांच्या सोबत मयूर पवार हे सहसंस्थापक असून, ते ग्रामीण भागाशी शेतकऱ्यांचे समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम पाहतात. मयूर यांनी विष्णुकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. सध्या कंपनीत सुमारे पंधरा जण काम करत आहेत.
शेतकऱ्यांना नफा मिळावा हाच हेतू
वृंदा बोरकर सांगतात की, “शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मालाला योग्य दर मिळावा, महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत आणि ग्राहकांना ताजे व सुरक्षित अन्न मिळावे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामसभांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित करणे, यावर आम्ही भर देतो.”
विंग्रो मार्केटच्या माध्यमातून शेतकरी थेट आपल्या शेतात पिकवलेला माल ग्राहकांच्या जवळच्या बाजारात आणतो. त्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होते आणि ग्राहकांना थेट उत्पादकाकडून खरेदी करण्याची संधी मिळते. आज सुमारे 1,250 शेतकरी आणि उत्पादक विंग्रो मार्केटमध्ये सहभागी असून, त्यातील बहुतांश उत्पादनं सेंद्रिय पद्धतीने घेतली जात आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी किंवा महिला बचत गटांना केवळ 300 ते 500 रुपये (जीएसटी वेगळा) इतक्या माफक शुल्कात स्टॉल लावता येतो.
2 कोटींची उलाढाल
कंपनीची उलाढाल सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, त्यातूनच संपूर्ण व्यवस्थेचा खर्च भागवला जातो. आज पुण्यात हडपसर, उंड्री, वाघोली, कात्रज तसेच मुंबईत कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथे विंग्रो मार्केट सुरू आहे. दर आठवड्याला पुणे आणि मुंबई परिसरात 46 बाजारपेठा यशस्वीपणे चालवल्या जात आहेत. भविष्यात आणखी शंभर बाजारपेठा सुरू करण्याचे स्वप्न विंग्रोच्या टीमने पाहिले आहे.
तसेच या उपक्रमाला HDFC परिवर्तन ग्रँट, निधी प्रयास, जवाहर रबी साकर ग्रँट, मराठी विज्ञान परिषदेकडील ‘सर विश्वेश्वरय्या पुरस्कार’ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाले आहेत.
