जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रचार टिपेला पोहोचला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, आरक्षण, याबरोबरच शेतमालाला मिळत असलेला कमी दर, शेतकऱ्यांच्या विविध समस्या हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. मराठवाडा, विदर्भातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी असो की उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी, सगळ्यांच्याच रोषचा सामना सरकारला करावा लागत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि कापूस दराबाबत शेतकऱ्यांशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला पाहुयात.
advertisement
'राज्यामध्ये सोयाबीन पिकाला 3,500 पासून ते 4,200 रुपयांपर्यंतच दर मिळतोय तर कापसाला 6,500 ते 7,000 प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. तीन वर्षांपूर्वी हेच दर सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल तर कापसाला 9,000 ते 10,000 रुपये प्रतिक्विंटल एवढे होते.
दिवाळीत थंडीची दांडी, नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिट! मग हुडहुडी कधी भरणार?
प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ होत आहे. दिवाळीसाठी कपडे घ्यायचे असेल तर त्याच्याही किमती दरवर्षी वाढतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढतच राहतात. खत आणि औषधांच्या किंमतीही दरवर्षी 200 ते 300 रुपयांनी वाढतात. मग 500 रुपयांना मिळणारी डीएपीची बॅग आता 1,400 रुपयांपर्यंत मिळत आहे. मग शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव का मिळत नाही', असा प्रश्न शेवगा तांडा येथील शेतकरी श्याम चव्हाण विचारतात.
'सोयाबीनला खर्च जास्त आणि भाव कमी अशी स्थिती आहे. बाजारात सोयाबीन घेऊन आलं की सोयाबीनचे मॉइश्चर चेक केलं जातं आणि त्यानुसारच 3,500 ते 4,200 रुपये दरम्यान भाव दिला जातो. सोयाबीनच्या एका बॅगला 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो तर उत्पन्न केवळ 5 ते 6 क्विंटल येतं. सरकार अनेक योजना देत आहे मात्र आमच्याच भावात कपात करून आम्हालाच पैसे देत आहे. राजकीय नेत्यांमध्ये ताळमेळ राहिला नाही. कोण कोणत्या पक्षात जाईल याचा मेळ नाही राजकारणाचं गजकरण झालं आहे. त्यामुळे आम्हाला देखील कोणत्या पक्षाला मतदान करावं ही कळत नाही' असं गोरखनाथ राठोड सांगतात.
'तेलाचे भाव महिनाभरापूर्वी 100 रुपये लिटर एवढे होते ते आता 150 रुपये लिटर झाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली पैसे अशा पद्धतीने सरकार वसूल करत आहे. सरकार एका हाताने देतय, दुसऱ्या हाताने काढून घेतय. कापसाला सध्या 7,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. शेतकऱ्यांना किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर कापसाला मिळाला हवा' असं सारवाडी येथील एका शेतकऱ्याने सांगितलं.





