तीव्र कमी दाबाचा प्रभाव
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अपेक्षित असलेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी पहाटे तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात विकसित झाले आहे. या बदलामुळे दसऱ्यापर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांवर या प्रणालीचा प्रभाव अधिक तीव्र जाणवू शकतो.
मराठवाड्यात काहीशी उघडीप
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने धुळधाण झालेल्या दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांत मंगळवार, ३० सप्टेंबरपासून दोन ते तीन दिवस वातावरणात आंशिक उघडीप मिळण्याची शक्यता आहे. तथापि, जमिनीतील आद्रता आणि आधीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना अजूनही नवी संकटे सामोरी येण्याची शक्यता आहे.
advertisement
पुरपरिस्थितीची भीती
राज्यातील मराठवाडा, विदर्भासह जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांत पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्यांच्या पात्रात पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढू शकतो. यामुळे खालच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाण्याची शक्यता आहे.
अंदमानजवळ नवे प्रणाली
हवामान तज्ञांच्या मते, ३० सप्टेंबरदरम्यान अंदमान समुद्रात नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. हे क्षेत्र वायव्येकडे सरकत उत्तर व उत्तर-मध्य भारतात प्रभावी होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होणार नाही. त्यामुळे ८ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पावसाच्या धोका काहीसा कमी झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
दसऱ्यानंतर काहीशी उघडीप
शुक्रवार, ३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उघडीप मिळू शकते. मात्र, ही उघडीप संपूर्ण राज्यभर एकसमान नसेल. मुंबईत दसऱ्यानंतरही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
एकूणच, मान्सूनच्या परतीला उशीर होत असल्याने महाराष्ट्रात पावसाची पकड अजून काही दिवस राहणार आहे. शेती आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणार असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.