मुंबई : हिंदू पंचांगानुसार सध्या पितृपक्षाचा पंधरवडा सुरू असून याचा समारोप 21 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या असून, योगायोगाने हाच दिवस या वर्षातील दुसऱ्या आणि शेवटच्या सूर्यग्रहणाचा दिवस आहे. जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचे काही ज्योतिषशास्त्रीय परिणाम राशींवर दिसू शकतात,
advertisement
पितृपक्ष आणि सर्वपित्री अमावस्या
पितृपक्षाला ‘श्राद्धपक्ष’ असेही म्हटले जाते. हा कालखंड 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी संपतो. या दिवशी अमावस्या श्राद्ध केले जाते. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या काळात श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि विविध दानधर्माचे विधी केले जातात. हिंदू धर्मानुसार यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-शांती येते.
श्राद्धाचे महत्त्वाचे विधी
पिंडदान : तांदळाचे गोळे, तूप आणि पाण्याच्या सहाय्याने पूर्वजांना अर्पण करणे.
तर्पण : कृष्ण तिळ आणि पाण्याने पूर्वजांना स्मरण करून आदर व्यक्त करणे.
दानधर्म : अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करणे पुण्य वाढवते.
श्राद्धविधी : स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, संकल्प घेऊन मंत्रोच्चारासह विधी करावेत.
सामाजिक उपक्रम : गरीब व गरजू व्यक्तींना भोजन घालणे हीदेखील पुण्य वाढवणारी परंपरा मानली जाते.
21 सप्टेंबर 2025 चे सूर्यग्रहण
या वर्षी दोन सूर्यग्रहण होत आहेत. पहिले 29 मार्चला झाले, जे भारतात दिसले नाही. दुसरे आणि शेवटचे ग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असून भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणासाठी धार्मिक दृष्टिकोनातून ‘सुतक’ लागू होत नाही. पूजा, अन्न किंवा इतर धार्मिक आचरणांवर कोणतेही बंधन नसले तरी ज्योतिषीय दृष्टिकोनातून काही राशींवर परिणाम अपेक्षित आहे.
राशीनुसार परिणाम
तणाव व अडचणीची शक्यता असलेल्या राशी : वृषभ, कर्क, सिंह, मकर, कुंभ व तूळ. या राशींच्या लोकांना आर्थिक ताण, आरोग्याच्या समस्या किंवा कौटुंबिक वाद संभवू शकतात.
मध्यम परिणाम : मिथुन व तूळ राशीच्या लोकांना मिश्र अनुभव येऊ शकतात.
शुभ परिणाम : मेष, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामात प्रगती व मानसिक समाधान मिळू शकते.
विशेष प्रभाव : कन्या राशी व उत्तर फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर ग्रहणाचा जास्त प्रभाव होऊ शकतो.
उपाय काय?
भारतात ग्रहण दिसणार नसल्याने कोणतेही कठोर धार्मिक नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तरीही काही काळजी घेणे हितकारक मानले जाते जसे की, वादविवाद व अपशब्द टाळा.
संयमित व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, सूर्याशी संबंधित मंत्रजप जसे “ॐ आदित्याय विद्महे…” करावा. तसेच ध्यानधारणा करून मन शांत ठेवणे फायदेशीर ठरेल.
अशा प्रकारे पितृपक्षाचा शेवटचा दिवस, सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण या त्रिवेणी योगामुळे हा दिवस धार्मिक व ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)