शब्दांचा जादुगार! मराठी कविता सातासमुद्रपार, 32 भाषांत अनुवाद अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Marathi Poem: निसर्ग, माती आणि माणसाची गोष्ट सांगणारी मराठमोळी कविता आता गुजराती शाळांतील विद्यार्थी शिकणार आहेत. मराठमोळे कवी गणेश आघाव यांनी याबाबत माहिती दिली.
पुणे : मराठी भाषेचा गौरव वाढवणारी आणि मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब आहे. हिंगोली जिल्ह्यातील सावळी खुर्द येथील कवी गणेश आघाव यांच्या ‘निसर्ग फुलला’ या कवितेला गुजरात राज्याच्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीतील साहित्य इतर राज्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणे ही अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी गोष्ट ठरली आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले गणेश आघाव यांनी आपल्या लेखणीने ग्रामीण मातीतली सुगंधी भावना शब्दांतून व्यक्त केली आहे. ‘निसर्ग फुलला’ या कवितेतून त्यांनी निसर्गाचे सौंदर्य, शेतकऱ्यांचे जीवन आणि मातीशी असलेले नाते अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. या कवितेचा अनुवाद आता गुजरातसह चार इतर भाषांमध्ये झाला असून, पुढील दहा वर्षे ती तेथील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवली जाणार आहे. त्यामुळे मराठी कवितेचा आवाज आता सातासमुद्रापार पोहोचला आहे.
advertisement
गणेश आघाव हे मराठवाड्याच्या मातीतील असे कवी आहेत, ज्यांनी शेती करतानाच साहित्य साधना केली. ते शेतात बसून कविता लिहितात आणि मातीचा सुगंध त्यांच्या प्रत्येक ओळीत जाणवतो. गेली 16 वर्षे ते साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कवितांना ग्रामीण वास्तव, निसर्ग आणि मानवी संवेदना यांचे अप्रतिम मिश्रण लाभले आहे. मातीच्या कविता, कणसाच्या कविता, मातीला फुटले हात, पोरी शाळेत निघाल्या, बारभाई हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह असून त्यांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
advertisement
विशेष म्हणजे, आघाव यांच्या कविता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या आणि परदेशाच्या वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांच्या काही कविता जपानी, पंजाबी, आसामी यांसह तब्बल 32 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यामुळे मराठी कवितेचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
गुजरात सरकारच्या शैक्षणिक विभागाने सातवीच्या पाठ्यपुस्तकात ‘निसर्ग फुलला’ ही कविता समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने मराठी भाषेचा गौरव वाढला आहे. या कवितेद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण जीवनाचे महत्त्व समजून घेण्याची प्रेरणा मिळणार आहे.
advertisement
कवी गणेश आघाव म्हणाले, मी लिहिलेल्या ओळी या माझ्या मातीशी असलेल्या संवादाच्या आहेत. आज त्या गुजरातसारख्या राज्यात शालेय पातळीवर शिकवल्या जाणार आहेत, ही माझ्यासाठी केवळ अभिमानाची नव्हे तर मराठी भाषेच्या विजयाची क्षण आहे.
मराठी भाषेचा विस्तार देशभर आणि परदेशात व्हावा, मराठी साहित्याच्या माध्यमातून नवीन पिढीला संवेदनशील विचारांची प्रेरणा मिळावी, हा गणेश आघाव यांचा ध्यास आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्याच्या मातीतून फुललेली कविता आता शिक्षणाच्या फुलबागेत उमलली आहे.
advertisement
निसर्ग, माती आणि माणूस यांचं नातं सांगणाऱ्या या कवितेमुळे मराठी भाषेचा सुवास आता गुजरातच्या शाळांमध्ये दररोज दरवळणार आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शब्दांचा जादुगार! मराठी कविता सातासमुद्रपार, 32 भाषांत अनुवाद अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?

