शेतकऱ्याची लेकी उगाच म्हणत नाही!, घरातून केला अभ्यास, MPSC परीक्षेत एका आठवड्यात 2 पदांना गवसणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये तिसरी आणि STI अशा दोन पदांना एकाच आठवड्यात गवसणी घालणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
सांगली : आभाळभर स्वप्नांना प्रामाणिक प्रयत्नांची जोड देत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील महादेववाडी या छोट्याशा खेड्यातील शेतकऱ्याच्या लेकीने धडाकेबाज यश मिळवले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये तिसरी आणि STI अशा दोन पदांना एकाच आठवड्यात गवसणी घालणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गौरी कदमला पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड होती. इयत्ता पहिली ते बारावी पहिल्या क्रमांकाने आणि चांगल्या मार्कांनी पास होणाऱ्या मुलीची बुद्धिमत्ता पाहून तिला मोठ्या पदावर बघण्याचं स्वप्न आई-वडिलांनी पाहिलं होतं. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने अभ्यासाची गोडी कायम राहिल्याचे गौरी सांगते.
शासकीय शाळेतून शैक्षणिक प्रवास
गौरीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण महादेववाडीमध्ये झाले. तिने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवले. त्यानंतर इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. ज्युनिअर कॉलेजमध्ये मन लावून अभ्यास करत तिने बारावी सायन्समध्ये 88 टक्के गुण मिळवले. बारावीतील या घवघवीत यशानंतर गौरीचा आत्मविश्वास आणखी मजबूत झाला.
advertisement
स्कॉलर विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीचे पाठबळ
बारावी सायन्समध्ये मिळवलेल्या 88 टक्क्यांनी तिला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी केंद्र सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित अशी इन्स्पायर स्कॉलरशिप जाहीर झाली. भरघोस शिष्यवृत्तीने स्वबळावर पुढची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळताच गौरीने आई-वडिलांच्या पाठिंब्याने पुणे गाठले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून 91 टक्क्यांसह उच्चशिक्षण पूर्ण केले.
advertisement
डोळसपणे स्वप्नांचा पाठलाग
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगत गौरीने प्रथम यूपीएससीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. परंतु पहिल्या प्रयत्नानंतर तिला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी याहून विशेष तयारीची, अधिक वेळेची गरज वाटली. पण इतक्यात तिची स्कॉलरशिपची वर्ष संपणार होती. स्वतःचे आर्थिक गणित वेळीच ओळखून गौरी UPSC तून एक पाऊल मागे घेत MPSC कडे वळली.
advertisement
घरी राहून केला अभ्यास
आणखी वेळ न घालवता तिने 2023 पासून MPSC च्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. घरची स्थिती बेताची असल्याने शिष्यवृत्ती शिवाय अधिक काळ पुण्यात राहणे परवडणारे नव्हते. मग गौरी पुन्हा गावी परतली आणि राहत्या घरी अभ्यास सुरु ठेवला. या काळात लग्नाच्या चर्चा, आर्थिक चणचण अशा गोष्टींमुळे मानसिक त्रास सहन केला. परंतु यशस्वी होण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण मी स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त दुसरा कोणताच करिअर प्लॅन ठेवला नव्हता. यामुळे अधिक दबावातून जावे लागल्याचे गौरी सांगते.
advertisement
सेल्फ स्टडीवर अधिक भर
पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड असल्याने गौरीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास समजून घेणे सोपे गेले. पुण्यातील एका नामांकित अकॅडमीमध्ये क्लासेस करण्याचा तिचा विचार होता. परंतु अकॅडमीची फी परवडणारी नसल्याने कठीण वाटणाऱ्या दोन विषयांसाठी तिने ऑनलाइन मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षांच्या मार्केटमध्ये फार न अडकता आत्मविश्वासाने सेल्फ स्टडीवर अधिक भर दिल्याचे गौरी आवर्जून सांगते.
advertisement
तसेच गौरीने मोबाईलचा योग्य वापर केला, नेहमी मन लावून अभ्यास केला तसेच संयमाने तिने खेड्यातील राहत्या घरी राहून यश मिळवल्याचे गौरीची आई अभिमानाने सांगते.
अफाट जिद्द, खंबीर मनोबल, संयमी स्वभाव, अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर गौरीने मिळवलेले यश तिच्यासह आसपासच्या सात खेड्यातील मुलींसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. आई-वडिलांचा पाठिंबा, बहिण-भावाची साथ, मित्र-मैत्रिणींची संगत आणि अभ्यासू गौरीचा संपूर्ण प्रवासच शहरासह गावखेड्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 08, 2025 9:15 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
शेतकऱ्याची लेकी उगाच म्हणत नाही!, घरातून केला अभ्यास, MPSC परीक्षेत एका आठवड्यात 2 पदांना गवसणी

