अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणने जोरदार प्रत्यु्त्तर दिले. इराणच्या कडव्या प्रतिकारामुळे इस्रायल-अमेरिकेची चिंता वाढली आहे. तीन-चार दिवसात युद्ध संपेल असा दावा अमेरिका-इस्रायलकडून करण्यात येत होता. मात्र, आता युद्ध सुरू होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. आखाती देशात असणारे अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने हल्लाबोल केला आहे. त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
काय आहे नेमकं प्रकरण?
अमेरिकेचे मध्य पूर्वेसाठीचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांनी पत्रकारांशी बोलताना खळबळजनक खुलासा केला. रशियाकडून इराणला 'टार्गेटिंग इन्फॉर्मेशन' (लक्ष्याची अचूक माहिती) दिली जात आहे. या माहितीचा वापर करून इराण क्षेत्रातील अमेरिकन युद्धनौका, विमाने आणि इतर लष्करी मालमत्तांवर अचूक हल्ले करू शकतो. विटकॉफ यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने रशियाला असा प्रकार थांबवण्याचा कडक संदेश पाठवला आहे.
ट्रम्प म्हणतात मला काळजी वाटत नाही...
यावेळी विटकॉफ यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. मात्र, ट्रम्प यांनी रशियाच्या या मदतीला फारसे महत्त्व दिले नाही. "गेल्या आठवड्यात इराणची जी अवस्था झाली आहे ती पाहता, रशियाकडून त्यांना कसलीही माहिती मिळत असली तरी त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये," असे ट्रम्प यांनी उपरोधिकपणे म्हटले. रशियाच्या या गुप्त माहितीमुळे युद्धाच्या निकालात फारसा फरक पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रशिया आणि इराणमधील वाढती जवळीक
युक्रेनविरुद्धच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाला क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची मोठी गरज आहे, जी इराण पूर्ण करत आहे. दुसरीकडे, अण्वस्त्र कार्यक्रम आणि हिजबुल्लाह, हमास सारख्या संघटनांना पाठिंबा दिल्यामुळे जागतिक स्तरावर एकटा पडलेल्या इराणसाठी रशियाचा साथ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
पुतीन यांचे शांततेचे आवाहन
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला. "मध्य पूर्वेतील कोणताही प्रश्न शक्तीने नाही, तर मुत्सद्देगिरीने (Diplomacy) सोडवला जावा," असे म्हणत पुतीन यांनी युद्ध थांबवण्याची गरज व्यक्त केली आहे.
