कोल्हापूर : कोल्हापूरकरांचं बाईक प्रेम सर्वांनाच माहितीये. अनेक विंटेज बाईक आणि कारचं कलेक्शनच कोल्हापूरकरांकडे आहे. त्यातच कोल्हापूरकरच नव्हे तर भारतीयांना भुरळ घालणारी गाडी म्हणजे रॉयल एनफिल्ड. खरं तर बुलेटची क्रेझ अगदी कॉलेज कुमारांपासून ते साठीतल्या आजोबांपर्यंत सगळ्यांमध्येच पाहायला मिळते. बुलेट ही अनेकांसाठी फक्त एक वाहन नाही तर प्रतिष्ठा आणि स्टेट्स सिम्बॉल आहे. कोल्हापुरातील बेंडके कुटुंबाकडे अशीच एक 67 वर्षे जुनी बुलेट आहे. पिढ्यानपिढ्या जपलेल्या याच विंटेज बुलेटची कहाणी आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
advertisement
कोल्हापुरातील बेंडके कुटुंबीयांकडे 1950 सालची एक बुलेट असून ती इंग्लंडमधून इंपोर्ट केली होती. या कुटुंबातील आजोबांनी 1958 मध्ये 3600 रुपयांना बुलेट खरेदी केली होती. त्यानंतर आजतागायत ही गाडी अगदी छान पद्धतीनं मेन्टेन करून ठेवली आहे. आज बेंडके यांची तिसरी आणि चौथी पिढी ही गाडी चालवतेय. विशेष म्हणजे 67 वर्षानंतरही गाडी सुस्थितीत असून गाडीचे सर्व पार्ट ओरिजनल आहेत, असं गाडीचे मालक समीर बेंडके सांगतात.
कोल्हापूरच्या रस्त्यावर 'ती' परत अवतरली, गाजवलं होतं 80 चं दशक, आजही कुणी करणार नाही बरोबरी!
कशी आहे रॉयल एनफिल्ड?
या रॉयल एनफिल्ड बुलेटची इंधन टाकी बरीच मोठी आणि आकर्षक आहे. तसेच या बाईकचे स्पीडोमीटर (मैलोमीटर) आणि इंधनाचे झाकण देखील अतिशय क्लासिक लुकमध्ये आहे. त्याचबरोबर गाडीचा हॉर्न जुन्या काळाची आठवण करून देतो. या 1958 च्या बुलेटमध्ये 4-स्ट्रोक, 350cc इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनमुळे मोटरसायकल गती आणि टॉर्कच्या बाबतीत उत्कृष्ट आहे. मोटरसायकलच्या अधिक चांगल्या इंधन कार्यक्षमतेमुळे, ती मोठ्या अंतरावर ड्रायव्हिंगसाठी देखील भारी आहे.
बुलेटसोबत अनोखं नातं
समीर बेंडके यांचे वडील जेव्हा ही गाडी वापरत असत. त्यावेळी ते एका रॉयल एनफिल्ड शाखेत गेले होते. त्यावेळी मद्रास शाखेचे अधिकारी उपस्थित होते. बेंडके यांनी आणलेल्या गाडीवर त्यांची नजर पडली. ही गाडी दिसताच क्षणी त्यांना भुरळ पडली. त्याच वेळी त्या अधिकाऱ्यांनी बेंडके यांच्या वडिलांना ही गाडी परत रॉयल एनफिल्ड कंपनीला पाठवून द्या, त्या बदल्यात रॉयल एनफिल्ड तुम्हाला दोन गाड्या देईल अशी ऑफर दिली होती. परंतु, ती ऑफर नाकारली. तसेच चार गाड्या दिल्या तरी ही गाडी देणार नसल्याची भूमिका घेतल्याचं समीर सांगतात.
दरम्यान, गेल्या 67 वर्षांपासून बेंडके कुटुंब रॉयल एनफिल्ड वापरत असून ती अगदी जशीच्या तशी आहे. कोल्हापूरकरांनी जपलेल्या हौसेला मोल नसतं. बेंडके सांगतात की, आजही आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स येत असतात. मात्र, आम्ही या सर्वच प्रकारच्या ऑफर नाकारल्या आहेत. आता बेंडके यांची चौथी पिढी देखील ही गाडी वापरतेय.





