प्रा. आनंद जेठे हे पुण्यातील धनकवडीमध्ये 'जेठेज अकॅडमी' नावाची संस्था चालवतात. ते UPSC, NDA, JEE, NEET, MPSC, CET अशा महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते, खरा समाज तेव्हाच घडतो, जेव्हा तरुण योग्य मार्गावर असतात. त्यांनी शिक्षण, संविधान आणि समाजकार्य यांचा त्रिवेणी संगम साधत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अपार क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास आहे. योग्य संधी मिळाल्यास ही मुलं फार प्रगती करू शकतात, असं त्यांचं मत आहे.
advertisement
शैक्षणिक दत्तक योजना
महानगरपालिकेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने प्रा. आनंद जेठे यांनी 'शैक्षणिक दत्तक योजना' सुरू केली आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये पूर्णतः मोफत प्रवेश दिला जातो. त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवून आणि वैयक्तिक मार्गदर्शन दिलं जातं. जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीचा विचार न करता, फक्त गुणवत्ता आणि आर्थिक अडचण याच निकषांवर विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाते. जेठे यांच्या उपक्रमामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी संधी आणि पालकांना दिलासा मिळत आहे.
राज्यपाल पुरस्काराने गौरव
प्रा. आनंद जेठे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत, महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे. राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना 'राज्यपाल पुरस्कार' मिळाला आहे.
सध्याच्या काळात शिक्षण महाग झालं आहे. शैक्षणिक मूल्ये हरवत चालली असून विद्यार्थ्यांवर स्पर्धेचं मोठं दडपण आहे. अशा वेळी प्रा. जेठे यांचं काम अनेक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.