नव्या आकृती बंधानुसार 2021 मध्ये 757 जागांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या 4 वर्षांत 300 हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले आहे. त्यामुळे आता विविध पदांसाठी 1076 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सन 1995 नंतर होणारी ही पहिलीच मेगाभरती असून टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबण्यात येईल. याबाबत पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.
advertisement
22 लाखांची सोडली नोकरी, सुरू केला स्वतःचा उद्योग; आज महिन्याला मिळतायत लाखोंच्या ऑर्डर्स!
कल्याण डोंबिवली महापालिकेत 1995 मध्ये शेवटची नोकरभरती करण्यात आली होती. यानंतर पालिकेत काही जागांवर अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. तर आकृतीबंध मंजूर झाल्यानतंर अनेक वर्षांपासून पालिकेत काम करणाऱ्यांना पदोन्नती देत काही रिक्त जागा भरण्यात आल्या. मात्र, तरीही पालिकेत कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, लिपीक आदी पदांच्या निम्म्याहून अधिक पदांवर कर्मचारीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाचा गाडा हाकताना दमछाक होत असून नोकरभरतीची मागणी होत होती.
दरम्यान, शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक उमेदावरांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असून टीसीएस मार्फत पारदर्शीपणे भरती होणार असल्याचं सांगितलं जातंय. भरतीची माहिती, उपलब्ध जागा, ऑनलाईन अर्ज याबाबत माहिती पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. तर अनेक दिवसांपासून भरती न झाल्याने घोडबाजार रंगण्याची भीती देखील व्यक्त होतेय.
आमिषाला बळी पडू नका
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच, नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडले जाऊ शकते. मात्र, ही भरती ऑनलाईन पद्धतीने निकष तपासूनच केली जाणार असून तरुणांनी रितसर अर्ज करून मुलाखत, लेखी परीक्षेला सामोरे जावे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अन्यथा फसवणूक होऊ शकते, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.