माहितीनुसार मंत्रालयाने सीबीएसईला बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा कशा घेतल्या जातील यावर विचार करायला सांगितलंय. बोर्ड त्यावर काम करत आहे आणि पुढच्या महिन्यात शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली जाईल. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून वर्षाच्या शेवटी बोर्ड परीक्षांच्या दोन आवृत्त्या घेण्याचा विचार केला जातोय; पण अजून त्यावर काम करण्याची गरज आहे; मात्र सेमिस्टर पद्धत लागू करण्याची कोणतीही योजना नाही.
advertisement
पुढे ढकलली होती योजना
मंत्रालयाची सुरुवातीची योजना 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा सुरू करण्याची होती; मात्र ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने (एनसीएफ) इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या अनुषंगाने सेमिस्टर प्रणाली प्रस्तावित केली आहे. या समितीचं नेतृत्व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांनी केलं होतं.
विद्यार्थ्यांना फायदा
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या रूपरेषेत विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देण्याचा पर्याय प्रस्तावित करण्यात आला होता. सीबीएसई सध्या त्यावर विचार करत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि बोर्डाच्या परीक्षा तणावमुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करता येईल; पण यासाठी एका पद्धतशीर आव्हानाला सामोरं जावं लागेल.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुलाखतीत पीटीआयला सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा देणं बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना जेईई या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेप्रमाणे वर्षातून दोनदा (इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड) परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. त्यातून ते सर्वोत्तम स्कोअर निवडू शकतात; पण ते पूर्णपणे ऐच्छिक असेल, काहीही बंधनकारक नसेल.
