ठाण्यातील रहिवासी पौर्णिमा सूर्यवंशी यांनी आपल्या मुलासाठी होमस्कूलिंगची निवड केली आहे. त्यांचा मुलगा सध्या दहावीची परीक्षा होमस्कूलिंगमार्फत देत आहे. त्या सांगतात, वारंवार होणारे शहरबदल, वाढती शाळेची फी आणि मुलाच्या सोयीसाठी आम्ही हा पर्याय निवडला. होमस्कूलिंगमुळे मुलाचा अभ्यास त्याच्या गतीनुसार होतो आणि त्याच्यातील कौशल्ये ओळखण्याची संधी आम्हाला मिळते.
advertisement
होमस्कूलिंग म्हणजे काय?
होमस्कूलिंग म्हणजे मुलांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी पालक स्वतः घेतात. पालक पुस्तके, व्हिडिओ, डिजिटल साधनं यांचा वापर करून मुलांना घरीच शिकवतात. वयानुसार मुलांना वर्गात प्रवेश दिला जातो आणि त्यांना परीक्षा द्यावी लागते.
होमस्कूलिंगचे फायदे
मुलाच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार अभ्यासक्रम आखता येतो.
कोणत्याही विषयात कमकुवत किंवा चांगले असलेल्या मुलावर विशेष लक्ष देता येते.
वारंवार स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
मुलांवर पीअर प्रेशर नसते; सुरक्षित वातावरण मिळते.
पालकांना मुलांची प्रतिभा ओळखता येते आणि शाळेच्या जादा फीपासून बचत होते.
होमस्कूलिंगचे तोटे
मुलांचे इतर मुलांशी कमी संपर्क येतो; सामाजिक कौशल्यांचा अभाव राहू शकतो.
पालकांना मोठ्या प्रमाणात वेळ आणि मेहनत द्यावी लागते.
प्रत्येक विषयात पालक तज्ञ असतीलच असे नाही.
सहली, गटक्रिया, खेळ यांचा मुलांना कमी अनुभव मिळतो.
घरून काम करणारे किंवा नोकरी-व्यवसाय न करणारे पालकांसाठीच हा पर्याय सोयीचा ठरतो.
सध्या देशभरात होमस्कूलिंगचा कल वाढताना दिसत आहे. मात्र, या पद्धतीत मुलांना शैक्षणिक ज्ञानासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव कसा मिळेल, हा प्रश्न मात्र पालकांसमोर कायम राहणार आहे.