Upsc Success Story : वडील शेतकरी तर आई गृहिणी, संगमनेरच्या धनंजयने मिळवली UPSC मध्ये 529 वी रँक
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
धनंजय दिघे यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत 529 वी रँक पटकावली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील धनंजय दिघे यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत 529 वी रँक पटकावली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या धनंजय दिघे यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या धनंजय यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण संगमनेर येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यात येत डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
advertisement
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसची आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी मनात जपले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2022 पासून UPSC परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2023 मध्ये त्यांनी पहिला प्रयत्न दिला, त्यानंतर सातत्याने प्रयत्न करत तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले.
advertisement
या प्रवासात धनंजय यांनी मुख्यत्वे सेल्फ स्टडीवर भर दिला. दररोज साधारण 8 ते 10 तास अभ्यास करत त्यांनी तयारी केली. अभ्यासाच्या या काळात कुटुंबीय आणि मित्रांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या या मेहनतीमुळे UPSC परीक्षेत 529 वी रँक मिळाली असून या रँकमुळे त्यांना आयपीएस पद मिळण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना धनंजय दिघे म्हणाले की, या यशामुळे मला खूप आनंद होत आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा मोठा आधार मिळाला. सातत्य, मेहनत आणि जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते.
advertisement
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदेश देताना त्यांनी सांगितले की, अभ्यास करत असताना अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच दोन-तीन प्रयत्नांमध्ये यश मिळाले नाही, तर स्वतःसाठी एक पर्यायी बी प्लॅन तयार ठेवणे देखील गरजेचे आहे.
ग्रामीण भागातून येऊन देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षेत यश मिळवत धनंजय दिघे यांनी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 9:43 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Upsc Success Story : वडील शेतकरी तर आई गृहिणी, संगमनेरच्या धनंजयने मिळवली UPSC मध्ये 529 वी रँक









