इस्त्रायल-इराण युद्धाचा महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीला फटका, 700 कंटेनर अडकले! Video
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधून जहाजात चढवलेली 300 कंटेनर द्राक्षे परत पाठविण्यात येत असल्याचे तसेच सुमारे 700 कंटेनर द्राक्षे बंदरातील शीतगृहात पडून असल्याने एक हजार कोटींच्या परकीय चलनावर पाणी सोडावे लागत असल्याची माहिती समोर येतीय.
सांगली: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इतर शेतमालांसह द्राक्षाची देखील निर्यात ठप्प झाली आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधून जहाजात चढवलेली 300 कंटेनर द्राक्षे परत पाठविण्यात येत असल्याचे तसेच सुमारे 700 कंटेनर द्राक्षे बंदरातील शीतगृहात पडून असल्याने एक हजार कोटींच्या परकीय चलनावर पाणी सोडावे लागत असल्याची माहिती समोर येतीय. अशातच द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या द्राक्ष शेतीची काय स्थिती आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊ द्राक्ष उत्पादक बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांच्याकडून...
सध्या युद्ध स्थिती असलेल्या देशात निर्यात थांबली आहे. मात्र युरोप आणि भारताच्या पूर्वेकडील देशांकडे निर्यात सुरळीत सुरू आहे. रमजान महिना आणि वाढत्या उन्हामुळे देशांतर्गत मागणी वाढली आहे. त्यामुळे दर घसरण्याची शक्यता नाही. शिवाय अफगाणिस्तानातील बेदाणा आवक बंद झाल्याने स्थानिक बेदाण्याच्या दरात वाढ शक्य असल्याची प्रतिक्रिया मारुती चव्हाण यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.
advertisement
जिल्ह्यातील द्राक्षांची दरवर्षी युरोप अमेरिका, ऑस्ट्रेलियासह आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. इराण, इराक, दुबई सह बहुतांश आखाती देश हे भारतीय द्राक्षांचे प्रमुख ग्राहक आहेत. यंदा रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर ही निर्यात अधिक फायदेशीर ठरेल आणि द्राक्षांना वेगवान उठाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र इस्रायल-अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारल्याने त्याचा परिणाम आखाती देशांमध्ये सर्वत्र दिसू लागला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून निर्यात होणारी द्राक्षे मोठ्या प्रमाणावर समुद्रात अडकून पडल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
नेमका किती शेतमाल अडकला?
विविध निर्यातदार कंपन्यांच्या माध्यमातून ही निर्यात होत असल्याने सांगली जिल्ह्यातील नेमका किती शेतमाल अडकला आहे, याची अचूक आकडेवारी कृषी विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. दरम्यान द्राक्ष निर्यातदारांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. युरोपकडे वाहतूक सुरळीत आहे. मात्र आखाती देशातील निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी व्यक्त केली.
advertisement
घाबरण्याची स्थिती नसल्याचे जाणकारांचे मत
सततच्या हवामान बदलाने सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादन कमी झाले आहे. सुमारे 70 टक्के मालाची विक्री पूर्ण झाली असून केवळ 30 टक्के माल शिल्लक राहिला आहे. पलूस तालुक्यात द्राक्ष हंगाम एप्रिल पर्यंत चालतो. तासगाव पश्चिम भागात ही मर्यादित माल शिल्लक आहे. मिरज तालुक्यात अवघे 10 ते 15 टक्के माल उरला आहे. जत तालुक्यातील बिळूर परिसरात काही प्रमाणात द्राक्ष शिल्लक असून संख भागातील द्राक्ष प्रामुख्याने बेदाण्यासाठीच तयार केलेली असतात. शिवाय वाढत्या उष्णतेमुळे उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादनातील तज्ञांचे मत आहे.
advertisement
उत्पादकांनी घाईगडबडीने विक्री करू नये; द्राक्ष बागायतदार संघटनेचे आवाहन
देशांतर्गत बाजारात द्राक्षाची मागणी वाढली असून पुरवठा अपुरा पडत आहे. गेल्या दोन दिवसात दरात वाढ झाल्याने बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघाने उत्पादकांनी कमी दरात विक्री टाळावी असे आवाहन केले आहे. बेदाणा बाजारातही सकारात्मक संकेत आहेत. आयात करणाऱ्या देशातील युद्धामुळे आयात ठप्प झाली आहे. परिणामी देशांतर्गत दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी घाईगडबडीने विक्री करू नये, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघटनेने शेतकऱ्यांना केले आहे.
advertisement
द्राक्ष घेऊन निघालेली जहाजे समुद्रात अडकून पडली असली आणि शेकडो टन द्राक्षमाल संकटात आला तरीही युरोपकडे निर्यात सुरळीत सुरू आहे. शिवाय रमजानचा महिना आणि वाढत्या उन्हामुळे देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला मोठी मागणी आहेच. यामुळे पूर्ण तोटा सहन करण्यापेक्षा बऱ्यापैकी आधार मिळेल अशी शक्यता द्राक्ष तज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान सध्या तरी युद्ध स्थितीचा पुढील परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिल.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 9:19 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
इस्त्रायल-इराण युद्धाचा महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीला फटका, 700 कंटेनर अडकले! Video






