मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील पटना जिल्ह्याच्या मनेर येथील आहे. इथं गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि नंतर तिचा मृतदेह एका निर्जन बागेत झाडाला लटकवण्यात आला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, त्यांनी मनेर-दानापूर मार्ग रोखून पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
advertisement
ही मुलगी मनेर येथील एका गावातील रहिवासी होती आणि २६ ऑगस्टपासून ती बेपत्ता होती. मुलीच्या आत्याच्या माहितीनुसार, ती २६ ऑगस्ट रोजी बागेत लाकूड आणण्यासाठी गेली होती, त्यानंतर ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता, पोलिसांनी त्यांना धमकावून परत पाठवलं. गुरुवारी सकाळी मासेमारी करणाऱ्यांना तिचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला.
घटनेची माहिती मिळताच एसपी वेस्ट भानु प्रताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, "मुलीची हत्या करून तिचा मृतदेह झाडावर लटकवण्यात आला आहे. बलात्कार झाला आहे की नाही, याची तपासणी केली जाईल. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्जन बागेत नेहमीच नशा करणाऱ्या दुर्गुल्यांची गर्दी असते. नशेखोरांनीच हे कृत्य केले असावे असा संशय आहे." फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने गोळा केले असून, बागेच्या मालकाकडून सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.