सारिका असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. ती तुळजापूर शहरातील पोलीस क्वॉर्टरमध्ये राहत होती. तिची आई निशा शिकारे ही पोलीस कॉन्स्टेबल आहे. सारिका हिने तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी मध्ये 31 मे आणि एक जूनच्या मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
मयत मुलीस आरोपींनी प्रेम कर आणि लग्न कर नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करेल. माझ्याकडील बंदुकीतून गोळी मारुन ठार करेन, अशी धमकी देण्यात आली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय सारिकाने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी आई निशा यांनी 10 जून रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार कांबळे आणि नगिना शशिंकात पांडागळे (दोघे रा. कांक्रबा ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता.कलम- 107,351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे हे करत आहेत. सारिका ही पोलीस कॉन्स्टेबल निशा शिकारे यांची एकुलती एक कन्या असून तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना न्यायालयात उभे केले असता, दोघांना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी ओंकार कांबळे याच्यावर यापूर्वी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आर्मी अॅक्टनुसार एक गुन्हा दाखल आहे. तसेच सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडीओ देखील सध्या तुफान व्हायरल होत आहे.