आरोपीकडे प्राथमिक चौकशी केली असता, त्याने एका सिगरेटसाठी हा खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
एका सिगरेटसाठी घेतला महिलेचा जीव
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे घडली. १५ जून रोजी ५५ वर्षीय कविता रायपूरे या घरात एकट्या होत्या. यावेळी आरोपी मुलगा धारदार शस्त्र घेऊन घरात शिरला आणि काही कळायच्या आत त्याने कविता यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी अल्पवयीन मुलगा हा याच परिसरातील रहिवासी आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही, म्हणून रागाच्या भरात त्याने हा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
advertisement
पहाटे घडला रक्तरंजित थरार
मयत कविता रायपुरे यांच्या घरी छोटं किराणा दुकान आहे. आरोपीची कविता यांच्याकडे उधारी चालत होती. आरोपीची जवळपास एक हजार रुपये उधारी असल्याने मयत महिलेने आधीची उधारी दिल्याशिवाय सिगरेट देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने पहाटेच्या सुमारास घरात घुसून कविता यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.