7 मिनिटांत जग हादरवणारी चोरी
20 ऑक्टोबर 2025, सकाळी 9;30 वाजता. पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये दिवसासारखीच गजबज होती. पण त्याच गर्दीत चार अज्ञात लोक शांतपणे आत प्रवेश करतात. काही मिनिटांतच त्यांनी अशी किमती चोरी केली की संपूर्ण जगाचे डोळे विस्फारले गेले. फक्त चार ते सात मिनिटांत अपोलो गॅलरीतील आठ महागडे दागिने गायब झाले आणि चोर कोणालाही इजा न करता, इकडे खबर तिकडे न होता चोरीला गेले.
advertisement
महिन्यांपूर्वी आखलेला प्लॅन
ही एखादी अचानक झालेली चोरी नव्हती. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरांनी महिन्यांपूर्वीपासून म्युझियमचं सर्वेक्षण सुरू केलं होतं. त्यांनी लूव्रच्या सुरक्षेतल्या छोट्या-छोट्या त्रुटी शोधल्या. रात्री चोरी करणं अशक्य होतं, त्यामुळे त्यांनी दिवसाढवळ्या सर्वांच्या नजरेसमोर हा प्लॅन राबवायचं ठरवलं. त्यांच्या डोक्यात आधीच सगळा प्लान छापला गेला होता. सगळं अगदी संयमाने पार पडलं.
बांधकाम कामगारांच्या वेशात आले चोर
त्या सकाळी, पॅरिसच्या रस्त्यावर एक “मोबाइल फ्रेट लिफ्ट” दिसली. लोकांना वाटलं काहीतरी बांधकाम चालू आहे. पण वास्तवात ते चोर होते. त्यांनी संग्रहालयाच्या साइड गेटजवळ पोहोचून परिसरात बांधकामाचे चिन्ह लावले. मग त्या लिफ्टमधून थेट दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीपर्यंत पोहोचले. हातात एंगल ग्राइंडर आणि चेहऱ्यावर मास्क लावलेलं होतं.
लिफ्टच्या शाफ्टमध्ये उभे राहून त्यांनी काही सेकंदांत खिडकीची काच कापली आणि आत प्रवेश केला. आत गेल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना गोंधळात टाकलं. स्वतःला सुरक्षा कर्मचारी असल्याचं सांगितलं. स्टाफने म्युझियम रिकामं करण्यास सुरुवात केली आणि त्या क्षणी त्यांनी थेट अपोलो गॅलरी गाठली.
गॅलरीत पोहोचताच त्यांनी दोन डिस्प्ले केस कापले आणि आतून आठ दागिने उचलले. एम्प्रेस मारी-लुईसचा इमराल्ड नेकलेस, क्वीन हॉर्टेन्सचा सॅफायर सेट आणि सम्राज्ञी यूजनीचा डायमंड ब्रोच*. पण त्यातील एक दागिना खाली पडला, पण बाकी सर्व त्यांनी पिशवीत भरले आणि फक्त काही सेकंदांत फरार....
त्या चोरांनी त्याच खिडकीतून बाहेर उडी घेतली आणि दोन यामाहा T-Max स्कूटरवर बसून वेगानं पॅरिसच्या रस्त्यांवरून पळ काढला. कोणी गोळीबार केला नाही, कोणी जखमी झालं नाही फक्त सात मिनिटांत जगातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या म्युझियममधून चोरी झाली.
पोलिसांना चोरीचा अंदाज काही मिनिटांनी आला. पँण तोपर्यंत चोर लांब गेले होते. फ्रान्सच्या कल्चर मिनिस्ट्रीनं याला “संगठित गुन्हा” म्हटलं. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याला “फ्रान्सच्या वारशावर हल्ला” म्हणत आरोपींना पकडण्याचं आश्वासन दिलं.
लूव्रमधील काही विभागांत सीसीटीव्ही कव्हरेज फक्त 40% पर्यंतच आहे, हेही तपासात उघड झालं. सरकार आता सुरक्षाव्यवस्था सुधारण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे म्युझियममधील गर्दी आणि तक्रारी वाढल्या आहेत.
ही चोरी लूव्रच्या इतिहासातील 1911 मधील मोनालिसा चोरीइतकीच मोठी मानली जात आहे. अजूनपर्यंत ते दागिने सापडले नाहीत. पण एकच प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे. इतक्या सुरक्षा असलेल्या ठिकाणी, दिवसाढवळ्या, सगळ्यांच्या नजरेसमोर ही चोरी कशी घडली?