वैभव नायकोडी असं अपहरण आणि हत्या झालेल्या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्याची आरोपींनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवचं अपहरण होण्याआधी २१ फेब्रुवारीला संदेश वाळुंज नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी संदेशला त्याच्या घराजवळून उचललं होतं. यानंतर अपहरणकर्त्यांनी संदेशला अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील गरवारे चौकात घेऊन जात बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला एका निर्जनस्थळी घेऊन जात, चेंबरमध्ये घालून मारण्यात आलं. आरोपींनी या मारहाणीचे व्हिडीओ काढले. तसेच त्याला एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवलं.
advertisement
संदेशच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी संदेशच्या फोनवर वैभव नायकोडीचा मेसेज आला होता. हा मेसेज आरोपींना पाहिल्यानंतर त्यांनी वैभवला देखील तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलवून घेतलं. वैभव त्याठिकाणी आला असता आरोपींनी त्याचंही अपहरण केलं. त्यानंतर आरोपी दोघांनाही पुन्हा त्याच निर्जनस्थळी घेऊन गेले. इथं गटारीसाठी बांधलेल्या चेंबरमध्ये घालून दोघांना बेदम मारहाण केली. पुन्हा दोघांना एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं. मारेकऱ्यांनी दोघांना मॅगी देखील खायला दिली. पण आरोपींनी दिलेली मॅगी आरोपीनं खाण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी पुन्हा वैभवला मारहाण केला. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यात वैभव निपचित पडून राहिला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोपींनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे हातपाय थंड पडले होते. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आरोपींनी वैभवचा मृतदेह नगर मनमाड रस्त्यावरील विळदघाट येथील केकताईच्या डोंगरात नेत जाळून टाकला. तसेच घटनेची वाच्यता कुठेही करू नको, अशी धमकी देत आरोपींनी संदेशला सोडून दिलं.
आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर संदेशनं सगळी आपबिती पोलिसांना सांगितली, याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी आणि पीडित तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद आहे. मयत वैभव ज्या ग्रुपसोबत राहतो, त्या टोळीने 19 जानेवारी रोजी अनिकेत उर्फ लपक्या सोमवंशी नावाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी संदेश आणि वैभवला मारहाण केली. या मारहाणीत वैभवचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
