विकी तनवर असं हल्ला झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. ४० ते ५० जणांच्या टोळीने पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड केली. यावेळी एकाने कारच्या समोरील काचेवर मोठा दगड फेकला. शिवाय हल्लेखोरांनी विकी तनवर यांच्यासह त्यांच्या पत्नीला देखील मारहाण केल्याचा आरोप तनवर यांनी केला. एवढंच नव्हे तर हल्लेखोरांनी दहशत माजवण्यासाठी चक्क हवेत गोळीबार देखील केल्याचा दावा विकी तनवर यांनी केला.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विकी तनवर हे आपल्या आजारी पत्नीला घेऊन उपचारासाठी दवाखान्यात जात होते. यावेळी त्यांच्या वाहनाची अडवणूक करून अक्षय हमपे आणि सुमारे ४० ते ५० युवकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या हल्ल्याबाबत अधिक माहिती देताना विकी तनवर यांनी सांगितलं की, "मी रात्री माझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन चाललो होतो. त्याच वेळी अक्षय हमपे याने अनेक साथीदारांसह माझा पाठलाग करून वाहन थांबवले आणि अचानक हल्ला केला. हवेत गोळीबार केला."
मध्यरात्री एका व्यावसायिकावर अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
