वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजं असताना आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात देखील असाच प्रकार घडला आहे. येथील गीता गावात एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली आहे. माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी महिलेचा मागील काही दिवसांपासून छळ सुरू होता. या छळाला कंटाळून महिलेनं बुधवारी टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
शुभांगी संतोष शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे. ती बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील रहिवासी आहे. तिने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, माहेरच्या लोकांनी आधीच चार लाख रुपये दिले होते. यानंतरही दोन लाख आण, म्हणून शुभांगीचा छळ सुरू होता. तिला अपमानजनक वागणूक दिली जात होती. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांनी हुंड्यासाठी जाच केल्याचं म्हटलं आहे.
