मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ सुभाष एन्नी (वय 23) असं मृताचे नाव असून तो सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी काठी आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून मंजुनाथच्या डोक्यावर वर्मी घाव बसले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
मंजुनाथ हा आरोपीच्या बहिणीशी संपर्क वाढवत होता आणि तिच्याशी वारंवार बोलत होता, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून आरोपीने मंजुनाथचा काटा काढण्याचे ठरवले आणि नियोजनबद्ध कट रचला. देवपूजेसाठी बाहेर पडलेला मंजुनाथ विठोबा मंदिराजवळ येताच आरोपीने त्याच्या डोक्यावर भीषण प्रहार केले, ज्यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, या प्रकरणी सुरेश अशोक एन्नी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सध्या राजापूर गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या Case मुळे पुन्हा एकदा वैयक्तिक वादातून टोकाची पावले उचलली जात असल्याचे समोर आले असून गुन्हेगारीच्या या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
