लग्नाविषयीच्या वादातून मुलानेच वडिलांच्या डोक्यावर वीट मारून त्यांची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील आथली गावात शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रात्री घडली. मृत व्यक्तीचे नाव पुरुषोत्तम कुंभलवार (५७) तर आरोपी मुलाचे नाव प्रदीप कुंभलवार (३३) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभलवार कुटुंब हे अल्पभूधारक शेतकरी असून कुटुंबात दोन मुलगे आहेत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जेवणानंतर पुरुषोत्तम, त्यांची पत्नी रेवता (५१) आणि धाकटा मुलगा प्रदीप घराच्या अंगणात बसून बोलत होते. मोठा मुलगा प्रेमकुमार (३५) त्या वेळी बाहेर गेला होता.
advertisement
या दरम्यान प्रदीपने वडिलांशी लग्नाच्या विषयावर चर्चा केली. “तुम्ही म्हातारे झालात, आमचं लग्न अजूनही झालं नाही, कधी लग्न लावून देणार, असा सवाल केला. त्यावरून बाप-लेकामध्ये जोरदार वादावादी झाली. वाद अधिक चिघळताच प्रदीपने रागाच्या भरात हाताशी आलेली वीट उचलून वडिलांच्या डोक्यावर जोरात मारली. या वारामुळे पुरुषोत्तम घटनास्थळीच बेशुद्ध पडले आणि गंभीर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आई रेवता यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरुन लाखांदूर पोलिसांनी प्रदीपविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेने आथली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका कौटुंबिक वादातून थेट जीवघेणी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.
आरोपी आणि त्याचा मोठा भाऊ हे दोन्ही जण अविवाहित आहेत. लग्नाच्या वादावरून मुलाने वडिलांनाच संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
