मीना ओमेश्वर कडू असं मृत पावलेल्या ३५ वर्षीय महिलेचं नाव आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता त्या आपल्या पती आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होत्या. हे चारही जण सरांडीवरून चिखला इथं आपल्या गावी जात होते. दरम्यान, सिहोरा येथील वाहणी गावाजवळून जात असताना दुचाकी स्लीप झाली. इथं एका पाण्याच्या टाकीजवळ शेण पडलं होतं. या शेणावरून चाक गेल्यानंतर दुचाकी घसरली.
advertisement
यावेळी मयत मीना या डांबरी रस्त्यावर खाली पडल्या. याचवेळी सिहोराकडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली मीना सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून बसचं चाक गेलं. दुचाकी घसरल्यानंतर मीना यांचे पती आणि दोन मुलं रस्त्याच्या डाव्या बाजुला पडल्याने तिघं बचावले.
पण दुर्दैवाने या दुर्घटनेत मीना यांचा जीव वाचू शकला नाही. दोन मुलं आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत मीना यांचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. गावावरून आपल्या स्वगावी जाणाऱ्या कुटुंबावर अशाप्रकारे काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.