या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली, तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडून जखमी तरुणाला रुग्णालयात नेलं; मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. रानीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बॅरक इथे राहणाऱ्या त्या तरुणाचं नाव मंजित कुमार राम असं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, भरगामा इथल्या खुटहा बैजनाथपूर गावातल्या एका मुलीवर त्या तरुणाचं प्रेम होतं. गुरुवारी (21 नोव्हेंबर) मध्यरात्री तो पिस्तुल घेऊन त्या मुलीच्या घरी गेला. तिथे गेल्यावर त्यानं मुलीच्या घरच्यांना धमकावलं. मुलीला त्याच्यासमोर आणण्यास सांगितलं. तसं केलं नाही तर सगळ्यांना गोळी मारीन असंही तो म्हणाला. त्यानंतर तो बांबूपासून तयार केलेल्या एका खोलीत निघून गेला आणि आतून दार बंद करून घेतलं.
advertisement
पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी त्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला. रानीगंज सर्कल इन्स्पेक्टर राजीव रंजन आणि भरगामा पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्यासह पोलिसांच्या पथकानं त्याला समजावलं. त्याला अटक न करता त्या मुलीशी लग्न लावून देऊ असंही सांगितलं; मात्र तरीही त्यानं रात्री एकच्या सुमाराला स्वतःवर गोळी झाडून घेतली.
पोलिसांनी अखेर दार तोडून त्याला पूर्णिया इथल्या खासगी रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुल जप्त केलं आहे. तरुणाने गळ्यातून झाडलेली गोळी डोक्यातून आरपार गेली होती.
मृताच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. मंजितला मुलीच्या कुटुंबीयांनी घरी बोलावलं होतं आणि त्यांनी त्याला दिवसभर खोलीत बंद करून ठेवलं होतं, असा आरोप त्याचा मोठा भाऊ बबलू राम यानं केलाय; मात्र मंजित मुलीकडच्यांना धमकावत होता, असं अरारियाचे एसपी अमित रंजन यांनी म्हटलंय. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस या प्रकरणात योग्य ती कारवाई करतील. या घटनेतील खरी बाजू कोणती हे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.