हा प्रकार बुधवारी दुपारचा सुमारास घडला. परिसरातून पायी जाणाऱ्या महिलांच्या मागे आरोपी जाऊन त्यांना वाईट उद्देशाने नको त्या ठिकाणी स्पर्श करत असे आणि नंतर पळून जात असे. काही महिलांनी या लज्जास्पद प्रकाराची माहिती स्थानिकांना दिल्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी तत्काळ पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. फुटेजमध्ये आरोपी महिलांना त्रास देत पळून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पोलिस पथकाने काही तासांतच आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. त्याची ओळख रफिक खान (रा. उत्तर प्रदेश) अशी झाली असून, तो सध्या संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होता.
advertisement
पोलिसांनी त्याच्याकडून प्राथमिक चौकशी केली असता, त्याने आपली चूक कबूल केली असल्याचे समजते. या घटनेने परिसरातील महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलांना दिलासा मिळाला असून, “अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना समाजात स्थान नाही” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले की, “महिलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या कोणालाही पोलिस यंत्रणा सोडणार नाही. अशा घटनांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात येईल.”
