सोमवारी सकाळी 10:30 च्या सुमारास वरूड फाट्याचे रहिवासी संजय जाधव हे चिखलठाण्यातील स्टेट बँकेच्या (SBI) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. जाधव एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच आत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मशीनमध्ये 'स्किमिंग पट्टी' सदृश्य वस्तू वापरून बिघाड घडवला होता. जेणेकरून मशीनमध्ये टाकलेले कार्ड अडकावे. जाधव यांनी एक हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे कार्ड मशीनमध्ये अडकले. ते कार्ड काढण्यासाठी धडपडत असताना जवळ उभ्या असलेल्या चोरट्याने त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या व्यवहारादरम्यान पिन नंबर पहिला.
advertisement
कार्ड निघत नाही हे पाहताच, त्या अनोळखी व्यक्तीने जाधव यांना चक्क मुकुंदवाडी सिग्नलवरील एटीएमकडे पाठवले आणि तिथे सुरक्षारक्षकाला भेटायला सांगितले, जेणेकरून तो कार्ड काढण्यासाठी इथे येईल.जाधव यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते रस्ता ओलांडून त्या समोरच्या सिग्नलवरील एटीएममध्ये गेले. त्याच क्षणी, त्यांना त्यांच्या मोबाईलवर नंबर नसलेला एक अनोळखी कॉल आला. कॉलवर त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होत असल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच, जाधव यांनी त्वरित एटीएम सेंटरकडे धाव घेतली.
जाधव परत आले, तेव्हा आतला व्यक्ती आणि त्यांचे एटीएम कार्ड दोन्हीही गायब झालेले होते. त्यांनी त्वरीत आपले खाते तपासले असता, त्यांच्या खात्यातून 43 हजार रुपये काढून घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, चोरट्याने ही रक्कम 2.6 किलोमीटर दूर असलेल्या धूत रुग्णालयाच्या जवळील दुसऱ्या एटीएम सेंटरमधून काढली होती.
- पोलिसांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
- अनोळखी लोकांच्या मदतीपासून दूर राहा- एटीएममध्ये कार्ड अडकल्यास किंवा व्यवहारात बिघाड झाल्यास, तेथे उपस्थित कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्या मदतीने प्रक्रिया करू नका आणि एटीएम सेंटर सोडू नका.
- त्वरित कार्ड ब्लॉक करा- त्वरित बँकेच्या अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधून कार्ड तात्काळ ब्लॉक करा.
- खाजगी पिन- आपला एटीएम कार्डचा पासवर्ड नेहमी की- पॅड झाकूनच टाका आणि कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्या.
- सावधगिरी बाळगा- एटीएममध्ये आधीच कोणी उभे असल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास, त्या सेंटरमध्ये व्यवहार करणे टाळा.
