सविता शिंगारे असं मयत सासूचं नाव आहे तर प्रतिक्षा शिंगारे असे आरोपी सुनेचे नाव आहे. शिंगारे कुटुंब काही दिवसांपासून प्रियदर्शनी कॉलनीत भाड्याच्या घरात राहात होते. सकाळच्या वेळी गोणीत भरलेला मृतदेह घरमालकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवला.
advertisement
सहा महिन्यापूर्वी लग्न, नव्या सूनबाईने केला घात...
आरोपी प्रतिक्षाचा विवाह आकाश शिंगारेसोबत झाला. लग्नानंतर दोन्ही नवदाम्पत्याचा संसार सुखाने सुरू होता. या दोघांसोबत आकाशची आई सविता शिंगारे सोबत राहत होती. कामाच्या निमित्ताने आकाश हा बाहेरगावी जात असे. त्यामुळे घरी सासू आणि सून एकत्रच असायच्या. काही दिवस सुरळीत सुरू असताना दुसरीकडे सूनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
आईचा मृतदेह पाहून आकाशने फोडला टाहो...
आईच्या हत्येची माहिती मिळताच आकाशने तातडीने जालन्यातील घर गाठले. आईचा मृतदेह पाहून आकाशला जबर धक्का बसला. "माझ्या आईला का मारलं? मारायचं होतं तर मला मारायचं, असं तो मोठमोठ्याने रडत रडत सांगत होता. माझ्यासोबत पटत नव्हतं, तर लग्न करायचं नव्हतं. कशाला लग्न केलं? माझ्या आईसोबत पटत नव्हतं, तर मला मारायचं असतं, कोणी एवढे निर्दयीपणे मारतं का?" असा टाहो त्याने फोडला.
सासूची हत्या का केली?
मुलगा बाहेरगावी असताना आपली सून ही फोनवर कोणासोबत तरी लपून बोलत असल्याचे सासू सविताला कळले. मात्र, ही कोणासोबत बोलते, याचा अंदाज सासूला बांधता आला नाही. मनात अनेक शंकांचे काहूर सासूच्या मनात उठले होते. सारखी सारखी कोणासोबत फोनवर बोलते, या प्रश्नावरून सासू आणि सूनेमध्ये जोरदार वाद झाले.
हत्या झाली तेव्हा बुधवारीदेखील सकाळच्या सुमारास वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या प्रतिक्षाने सासू सविताचे भिंतीवर डोक आपटले. त्यानंतर तिच्यावर चाकूने सपासप वार केले. सासूला संपल्याचे समजल्यानंतर प्रतिक्षा घाबरली. पुढील बनाव रचण्यासाठी तिने सासूचा मृतदेह गोणीत कोंबला आणि विल्हेवाटाचा प्रयत्न करू लागली. घरातून गोणी काढून तिने घराच्या खाली आणली. मात्र, तिचे हे कृत्य घर मालक पाहत होता. घरमालकाने पाहिले असल्याचे समजताच तिने रेल्वे स्टेशनवर पळ काढत परभणीत आपले घर गाठले. तर, इकडे संशय आल्याने घर मालकाने पोलिसांना गोणीबाबत माहिती दिली आणि हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी प्रतिक्षाला परभणीमधून ताब्यात घेतले.