लवकर करणार होते लग्न पण...
मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचा पार्टनर दिलीप जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) जवान असून, तो मणिपूरमध्ये तैनात आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शेजारच्या गावांचे रहिवासी असलेले हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. अरुणा या लखतर तालुक्यातील डेरवाला गावच्या, तर दिलीप लिंबडी तालुक्यातील टोकरला गावचा रहिवासी आहे.
advertisement
दिलीपचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही सुट्टीवर होते आणि शॉपिंग तसेच छोट्या सुट्टीसाठी अहमदाबादला गेले होते. कच्छ पूर्वचे पोलीस अधीक्षक, सागर बागमार यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले, "वादाच्या भरात जाधवने अरुणाचा गळा आवळून खून केला. आपण काय केले याची जाणीव झाल्यावर, त्याने चाकूने मनगट कापून आणि फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला उलटी झाली आणि तो वाचला."
मृतदेहाजवळ 11 तास बसला
ही भयानक घटना अंजारमधील गंगोत्री सोसायटीतील एका भाड्याच्या घरात घडली, जिथे हे जोडपे राहत होते. शेजाऱ्यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये मोठा वाद ऐकल्याचे सांगितले. आरोपी शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मृतदेहासोबत होता. त्यानंतर शनिवारी सकाळी दिलीप जाधव अंजार पोलीस स्टेशनमध्ये चालत गेला आणि त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपी ताब्यात
अंजार पोलीस निरीक्षक अजयसिंग गोहिल यांनी सांगितलं की, "दिलीपच्या कबुलीजबाबामुळे आम्हाला अरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. आम्ही पीडितेच्या कुटुंबियांना कळवले आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या हत्येकडे नेणाऱ्या घटनाक्रमाचा आम्ही तपास करत आहोत." या घटनेने परिसरात आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे.