BMW कारची दुचाकीला धडक
रविवार संध्याकाळी दिल्ली कॅन्ट मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात झाला. एका भरधाव BMW कारने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेले नवजोत सिंह यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. हे दाम्पत्य बंगला साहिब गुरुद्वारातून घरी परत येत होते, त्यावेळी हा अपघात घडला.
advertisement
गगनप्रीत पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, अपघातावेळी BMW कार गगनप्रीत नावाच्या महिलेच्या ताब्यात होती आणि तिचा पती तिच्या शेजारी बसला होता. धडकेनंतर कार पलटी झाली, तर दुचाकी डिव्हायडरजवळ पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत सापडली.
19 किलोमीटर लांब असलेल्या रुग्णालयात का नेलं?
अपघातानंतर नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला उपचारासाठी न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता हेच रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला चालक गगनप्रीतच्या वडिलांचे हे रुग्णालय आहे. तिचे वडील परीक्षित या रुग्णालयाच्या तीन भागीदारांपैकी एक आहेत. यामुळेच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताच्या ठिकाणापासून जवळपास 17-19 किलोमीटर दूर असलेल्या या रुग्णालयात जखमींना का नेण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
...तर जीव वाचला असता
घटनास्थळाच्या जवळ एम्ससारखी अनेक मोठी रुग्णालये असतानाही हा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश् नवजोतच्या मुलाने देखील विचारला आहे. नवजोत सिंह यांच्या मुलानेही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जर माझ्या वडिलांना जवळच्या आणि चांगल्या रुग्णालयात नेले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांचा तपास नव्या दिशेने सुरू
दरम्यान, पोलिसांनी या माहितीची पुष्टी केली असून, या प्रकरणाचा तपास आता नव्या दिशेने सुरू आहे. आरोपी महिलेने जाणूनबुजून पुरावे लपवण्यासाठी जखमींना तिच्या वडिलांच्या रुग्णालयात नेले का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.