ही धक्कादायक घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातल्या मुलबागल तालुक्यात घडली आहे आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
काय घडलं नेमकं?
मृत व्यक्तीचं नाव लोकेश (वय 37) असं आहे, त्याने आपल्या मुलगी निहारिका (वय 4) हिचा गळा दाबून खून केला आणि नंतर झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, लोकेशची बायको नव्याश्री काही दिवसांपूर्वी दुसऱ्या व्यक्तीसोबत घर सोडून गेली होती. घर सोडताना तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यात म्हटलं होतं
advertisement
"मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे, मला शोधू नको."
ही चिठ्ठी वाचल्यानंतर लोकेश मानसिकदृष्ट्या खचला. चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं ओझं, पत्नीचं परत न येणं आणि लोकांच्या बोलण्याचा दबाव या सगळ्याचा त्याच्यावर तीव्र परिणाम झाला.
मंगळवारी लोकेशने पत्नी हरवलेली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर त्याने मुलगी निहारिकाला सोबत घेतलं आणि तिला जवळच्या बेकरीत नेलं. तिथल्या मालकाच्या मते, तो शांत होता पण चेहऱ्यावर गहन तणाव दिसत होता. त्याने तिथे त्याच्या मुलीला जी पाहिजे ती वस्तू खायला दिली. मनसोक्त खाऊ दिलं त्यानंतर तो मुलीला कारने घेऊन निघाला. पुढे काही तासांनंतर तिथेच त्याने आधी मुलीचा गळा दाबून खून केला आणि मग झाडाला लटकून आत्महत्या केली.
सकाळी दिसलं भयानक दृश्य
बुधवारी सकाळी स्थानिक लोकांना रस्त्याच्या कडेला उभी कार दिसली. आत मुलीचा मृतदेह होता आणि काही अंतरावर झाडाला लोकेश लटकलेला दिसला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
लोकेशच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, नव्याश्री आणि तिच्या प्रियकराने त्यांच्या मुलाला मानसिक त्रास दिला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी IPC कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ आणि संतापाचं वातावरण आहे. लोक विचारात पडलेत की, एका वडिलांनी स्वतःच्या लेकराचा जीव घ्यायचं ठरवावं, इतका त्रास कसा झाला असेल? पोलिसांचा अंदाज आहे की ही घटना पूर्णपणे मानसिक ताण आणि भावनिक आघाताचा परिणाम आहे.
